नाताळ आणि नववर्षांच्या पाटर्य़ा म्हटल्या की केक, वाइन, मद्याची लयलूट ठरलेली. बच्चेकंपनीसाठी चॉकलेटचा बाजारही तेजीत. नेमकी हीच वेळ साधून मोठय़ा प्रमाणावर मागणी असलेल्या या उत्पादनांमध्ये भेसळीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यंदाच्या वर्षी केक, वाइन आणि चॉकलेटची भेसळ हुडकून काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, कळवा यांसारख्या शहरांतील हॉटेलांमधील अन्न पदार्थाचे नमुने घेण्यास सुरुवात झाली असून केक आणि चॉकलेट या विभागाच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे.  
अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमानुसार अन्न पदार्थाचा दर्जा राखताना त्रुटी आढळून आलेल्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली परिसरातील १५०० पेक्षा अधिक हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. सणाच्या काळातील उत्साही वातावरणावर विषबाधेसारख्या घटना घडून आनंदाला विरजण पडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यासंबंधीची मोहीम हाती घेतली आहे. नववर्षांच्या काळात बेकरी उत्पादने, चॉकलेटचे पदार्थ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याला मोठी मागणी असते. नववर्षांच्या तोंडावर उंची मद्यातही भेसळीचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. परदेशी कंपन्यांच्या उंची मद्याला या काळात मोठी मागणी असते. असे असताना काही प्रथितयश परदेशी ब्रँड असलेल्या मद्यातही भेसळ केली गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याशिवाय केक, चॉकलेट, वाइनमध्येही भेसळीचे प्रकार वाढीस लागले असून यासंबंधीच्या काही तक्रारी सातत्याने पुढे येऊ लागल्या आहेत.
या तक्रारी लक्षात घेऊन अन्न पदार्थाच्या गुणवत्तेच्या चाचण्या शहरातील विविध भागांत घेतल्या जाऊ लागल्या आहेत. यासंबंधी ठाणे, नवी मुंबई भागांतील हॉटेल मालक असोसिएशनची नुकतीच एक बैठक घेण्यात आली आहे. हॉटेल मालकांनी स्वच्छतेसंबंधी कोणते नियम पाळावेत यासंबंधी कसून सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली. हॉटेल उद्योगामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचा निकष पूर्ण करताना हलगर्जीपणा होत असल्याचे या मोहिमेत आढळून आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बनावट दारूवर कारवाई करण्यात येत असली तरी नागरिकांच्या सेवनाशी याचा संबंध असल्याने अशा प्रकाराकडेही अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. तसेच नागरिकांना या प्रकारांवर काही तक्रारी असल्यास त्यांच्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने १८००२२२३६५ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर नागरिकांनी आपल्या तक्रारी द्याव्यात, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.