कधी डिलिव्हरी बॉय म्हणून तर कधी विक्रेता म्हणून घरात एकटी महिला किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत हे पाहून चोरी करून पोबारा करायचा अशा घटना मुंबई शहरासह उपनगरातही सातत्याने घडत आहेत. अशा प्रकारे चोरी करणाऱ्या भामटय़ांनी आता गॅस कंपनीचे तोतया प्रतिनिधी होऊन घरात प्रवेश करण्यावर भर दिला आहे. अशा भामटय़ांच्या टोळ्या सध्या सर्वत्र सक्रिय झाल्या आहेत. नुकत्याच अशा पद्धतीच्या दोन घटना उघडकीस आल्या.
बुधवारी कांदिवली येथे एका गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत एका इसमाने एका महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पोबारा केला. या भामटय़ांच्या टोळ्या दुपारच्या वेळी घरात प्रवेश करतात. त्या वेळी महिला आणि वृद्ध माणसे घरात एकटे असतात. नामांकित गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगितल्याने त्यांना सहज प्रवेश मिळतो. त्यानंतर मग घरात ती महिला किंवा वृद्ध एकटे असल्याचा फायदा उठवत त्यांना कधी फसवले जाते तर कधी लुटले जाते. बुधवारी दुपारी कांदिवली पूर्वेच्या साईधाम मंदिराजवळील दत्तानी पार्क या इमारतीत एक भामटा शिरला. एका खागजी गॅस कंपनीचे प्रतिनिधी असून तपासणीसाठी आल्याचे सांगितले. घरात एकटय़ा असणाऱ्या महिलेने त्याला प्रवेश दिला. त्याने काही वेळ गॅस तपासणीचा देखावा केला. घरात कुणी नाही याचा अंदाज घेतला. त्यांनतर या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळ काढला. मागील महिन्यात कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने एका भामटय़ाने गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत एका घरात प्रवेश मिळवला. त्या वेळी घरात ७८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक एकटेच होते. गॅसमधून गळती होतेय असे खोटे सांगून त्याने घरातील या वृद्ध व्यक्तीकडून ७ हजार रुपये उकळले होते. नंतर हा प्रतिनिधी भामटा असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही.
खबरदारी घ्या
घरामध्ये कुठल्याही कंपनीच्या प्रतिनिधींना प्रवेश देताना त्याचे ओळखपत्र पाहून किंवा खात्री करूनच प्रवेश द्यावा. घरात एकटे असताना याबाबत अधिक दक्ष राहावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.