नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात होणाऱ्या नागरी विकास कामांचा दर्जा पडताळणीसाठी महापालिकेने त्रयस्थ संस्थाची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे शहरात नागरिकांना अपेक्षित असणारी दर्जेदार कामे होतील, असा विश्वास महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या नियंत्रणाखाली पालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या १० कोटीपेक्षा अधिक रकमेच्या कामांचा आयआयटी या मान्यताप्राप्त संस्थेकडून व १० कोटीपेक्षा कमी खर्चाच्या कामांचे पुणे येथील नामांकित शासकीय आभियांत्रिकी महाविद्यालयातील अनुभवसंपन्न तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करून घेण्यात येणार आहे.
कामातील गुणवत्ता त्रयस्थ तज्ज्ञांकडून तपासून घेण्यासाठी १० कोटी रुपये रकमेवरील कामाच्या निविदेची तांत्रिक छाननी करण्याकरिता तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये एमएमआरडीए, सिडको, आयआयटी, व्हीजेटीआय या नामांकित संस्थेतील उच्चपदस्थ अधिकारी तांत्रिक सदस्य असल्याने निविदाकारांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे शक्य होत आहे. त्यामुळे चांगले कंत्राटदार निवडून कामाचा दर्जा चांगला राखला जात आहे. शासन निर्णयाप्रमाणे १० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरीक्षण आयआयटीसारख्या नांमाकित संस्थेकडून केले जात आहे. १० कोटींपेक्षा कमी रकमेच्या कामाकरिता त्रयस्थ संस्था नेमण्यात येऊन त्यांच्यामार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करून घेण्यास आता सुरुवात केली आहे. तसेच कामाचे डिझाइन त्यांची गुणवत्ता व दर्जा राहण्याकरिता आयआयटीसारख्या नामांकित संस्थेला संलग्न करण्यात आले आहे.
१० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांकरिता ई-निविदा पद्धत अवलंबविण्यात येऊन महापालिकेच्या कामात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने अधिक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिकेच्या कामकाजामध्ये अधिक पारदर्शकता असावी व कामांचे काटेकोरपणे तांत्रिक लेखापरीक्षण व्हावे आणि यांमधून उच्चतम दर्जाच्या नागरी सुविधा जनतेस मिळाव्यात याकरिता आंभियांत्रिकी विभागामार्फत आवश्यक त्या सर्व बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देण्यात येत आहे. विकासकामांची त्रयस्थ संस्थेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करून घेणे ही कामाच्या गुणवत्तावृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे मत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केले.