अभिजित अपस्तंभ यांचे गायन
मराठवाडा जनविकास परिषदेतर्फे सोमवार २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे येथे स्नेहमेळावा  तसेच नांदेड येथील तरुण गायक अभिजित अपस्तंभ यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालिका श्रद्धा बेलसरे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. डेक्कन र्मचट्स कोऑप. बँकेचे अध्यक्ष के.डी.मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला असून संगीतप्रेमींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क -अण्णासाहेब टेकाळे-९८६७८७२४४४.
‘ठाणे उद्योगरत्न’ पुस्तकाचे प्रकाशन
 ‘साप्ताहिक विवेक’तर्फे शुक्रवार, १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गोखले मंगल भवन सभागृह, बेडेकर शाळेजवळ, ठाणे येथे ठाण्यातील निरनिराळ्या क्षेत्रांत कार्यरत कृतिशील उद्योगांचा परिचय करून देणाऱ्या ‘ठाणे उद्योगरत्न’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी गोव्याचे उप-मुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष शंतनु भडकमकर या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. डोंबिवली येथील चार्टर्ड अकाऊटंट उदय कर्वे या वेळी उपस्थित राहणार आहेत. अधिकाधिक ठाणेकरांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यात ‘कोळी महोत्सव’
‘चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच’तर्फे रविवार, २० जानेवारी रोजी रात्री ७ ते १० या वेळेत मिठबंदर कस्टम जेटी, ठाणे (पू.) येथे कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उपक्रमांचे आयोजन या वेळी करण्यात आले आहे.
‘अभंगरंग’
‘राजा परांजपे प्रॉडक्शन’तर्फे रविवार, २० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात ‘अभंगरंग’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चैतन्य कुलकर्णी, कल्याणी पांडे-साळुंके आणि संजीव अभ्यंकर हे गायक विविध अभंग सादर करणार आहेत. तसेच प्रसाद जोशी, नंदकुमार भांडवलकर, प्रसाद भांडवलकर, दीप्ती कुलकर्णी हे वादक कलाकार या वेळी साथ करणार आहेत. सूत्रसंचालन श्रेयस बडवे करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना अर्चना राणे यांची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – अर्चना राणे – ९८२२३०७९९५.
‘सुनो मेरी आवाज’
‘ब्रह्मांड आझादनगर बस प्रवासी संघा’च्या वतीने रविवार, २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांज-स्नेह ज्येष्ठ नागरिक सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकीमागे, आझादनगर, ठाणे येथे ‘सुनो मेरी आवाज’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कट्टय़ाचे संभाजी तुपे, गायिका प्रगती तांबे, शीतल आणि सचिन गावडे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सूत्रसंचालन श्रुती शेलार करतील. कार्यक्रमाची निर्मिती अश्मीत कुमार यांची आहे. अधिक माहितीसाठी  संपर्क – ९८२०६५६४६३ / ९८२०१६९०३७.
‘भविष्यातील तंत्रज्ञान’ – चर्चासत्र
ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयाच्या वतीने १८ आणि १९ जानेवारी या कालावधीत सकाळी ९.३० ते ५ या वेळेत महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात ‘भविष्यातील तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चा करण्यासाठी ‘फ्युटेक २०१३’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२०८४१४३१ / ९००४८५७९८५.
कुणबी समाजाचे स्नेहसंमेलन
ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघाचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता येथील सॅटेलाइट टॉवर, येऊर येथे आयोजित करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी आयोजित करण्यात आले असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. विवध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स या वेळी उभारण्यात आले आहेत.
‘आम्ही मायलेकी’
डोंबिवली- ज्ञानदीप स्त्रीजागृती मंचतर्फे एकल महिला, त्यांच्या मुली यांच्या नात्यांचा वेध घेणारा ‘आम्ही मायलेकी’ हा कार्यक्रम २० जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजता श्रीखंडेवाडीतील श्री साई शुभ कार्यालय येथे आयोजित केला आहे. स्त्री-मुक्ती संघटनेच्या डॉ. करुणा गोखले, ‘लोकसत्ता’ चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम, संस्थेच्या संस्थापिका भारती मोरे, अध्यक्षा सुनेत्रा दिढे, संपदा वाड उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८६७४१६०१८.
‘रविवारीय संगीत सेवा’
डोंबिवली पूर्व येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून ‘रविवारीय संगीत सेवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील नवोदित आणि नामवंत अशा दोघांनाही आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे म्हणून हा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त रविवार, २० जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गायिका गौरी कवी-मिरजगांवकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सर्व रसिक आणि भाविकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
ठाण्यात राज्यस्तरीय शिक्षक संमेलन
शिक्षकांमधील लेखनकौशल्यास प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले जाणारे राज्यव्यापी साहित्य संमेलन यंदा शनिवार, १९ जानेवारी रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आले असून विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वर्षी नाटककार शफाअत खान संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यंदा संमेलनाचे तीसरे वर्ष आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजता ‘विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी युवराज मोहिते हे अच्युत गोडबोले, सुबोध जावडेकर आणि दा. कृ. सोमण यांच्याशी संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी २.३० वाजता प्रा. प्रज्ञा पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कवी अनुपमा उजगरे, सतिश सोळंकुरकर, किरण येले, प्रशांत मोरे, अनिल ठाकुर, अरुण म्हात्रे आणि संभाजी मोडक या वेळी सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या समारोप सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरे असणार आहेत.
उस्ताद झाकीर हुसेन-उस्ताद राशिद खान प्रथमच एकत्र
पंचम निषाद या संगीत प्रसारासाठी कार्यरत संस्थेने शनिवार, १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता फाईन आर्ट्स सोसायटी, चेंबूर येथील शिवास्वामी सभागृहामध्ये ‘म्युझिक अ‍ॅण्ड ऱ्हिदम मास्टस’ या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील रामपूर-सहासवान घराण्याचे गायक उस्ताद राशिद खान आणि तबलानवाझ उस्ताद झाकीर हुसेन असे दोन दिग्गज प्रथमच मैफलीमध्ये एकत्रितपणे आपली अदाकारी सादर करणार आहेत. या ऐतिहासिक घटनेबरोबरच इमादखानी घराण्याचे सतारवादक बुद्धादित्य मुखर्जी हेसुद्धा तब्बल २० वर्षांच्या कालखंडानंतर या मैफलीतील दुसऱ्या सत्रात उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर वादन करणार आहेत. वादन आणि गायनातील तीन दिग्गजांना एकत्र ऐकण्याची संधी या निमित्ताने मुंबईकर शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. संपर्क – २४१२४७५०
देवदत्त पाडेकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन
‘संवेदना’ निसर्ग हाच विषय मुख्यत्वे आपल्या चित्रांतून हाताळणारे देवदत्त पाडेकर यांच्या चित्रांचे ‘संवेदना’ हे प्रदर्शन २२ जानेवारीपासून जहांगीर कला दालनात सुरू होत आहे. निसर्गात स्थिर असे काही नसते. सर्व काही गतिमान आहे. सर्व जीवसृष्टीत हालचाल आहे. बहरलेले झाड असो, पाण्यातील तरंग असो, पानांची सळसळ असो की पक्ष्यांची फडफड असो या साऱ्याबरोबर माणसाचे भावनिक नाते आहे, असे मत असलेले देवदत्त पाडेकर यांनी हे नाते दाखविण्याचा प्रयत्न ‘संवेदना’ या प्रदर्शनांतील चित्रांमधून केला आहे. यातील सर्व चित्रे तैलरंग आणि पेस्टल रंग या दोन माध्यमातील आहेत. नैसर्गिक रंगछटांचा प्रभावी वापर, नैसर्गिक आकार आणि मानवाकृती यांची सांगड घातलेली चित्रे यात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन २२ ते २८ जानेवारीदरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.
सी. आर. शेलारे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
वन्यजीव छायाचित्रणासाठी पुरस्कार मिळविण्याबरोबरच कलमश्री केकी मूस आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते यवतमाळचे छायाचित्रकार सी. आर. शेलारे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन गुरुवारपासून काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. विस्तीर्ण आकाशाखाली डोंबाऱ्याचा खेळ करणारी छोटुकली, पहाटेच्या वेळी गायींना चरायला नेत असलेला खेडुत, पाण्यात मनमुराद डुंबणारी मुले अशी अनेक छायाचित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन २३ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहावयास मिळेल.
ज. द. जोगळेकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन
ज्येष्ठ विचारवंत आणि स्वा. सावरकर यांच्या तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक तसेच युद्धशास्त्र, राष्ट्रवाद, इस्लाम, साम्यवाद या विषयांचे अभ्यासक असलेल्या ज. द. जोगळेकर यांच्या ‘एका हिंदुत्वनिष्ठाची आत्मकथा’ या आत्मचरित्राचे प्रकाशन २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. नवचैतन्य प्रकाशन आणि धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथजी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशन समारंभाचे आयोजन वसंत स्मृती, तिसरा मजला, रणजित स्टुडिओजवळ, दादासाहेब फाळके मार्ग, दादर पूर्व येथे केले आहे.
राष्ट्रीय मतदाता मंचाचा जाहीर कार्यक्रम
लोकशाही प्रणाली व सुयोग्य प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे २५ जानेवारीच्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘आघाडय़ांचे राजकारण – सुयोग्य दिशा’ या विषयावर जाहीर कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर सभागृह, डी. एल. वैद्य मार्ग, दादर पश्चिम येथे केले आहे. पुढील १०-१५ वर्षांत आघाडय़ांच्या राजकारणाला पर्याय नाही असे मानले जाते आहे. समाजात या विषयावर चर्चा व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ पत्रकार व खासदार भारतकुमार राऊत आणि न्यूज भारतीचे संपादक अरूण करमरकर वक्ते असतील. संपर्क – ९८६९००९४०९ (अजित शेणॉय), ९८१९०९३००८ (प्रा. रत्नाकर कामत).