‘एक दूजे के लिए’, ‘सदमा’, ‘सागर’, ‘जरासी जिंदगी’, ‘राजतिलक’, ‘यह तो कमाल हो गया’ अशा काही हिंदी आणि ‘पुष्पक’, ‘अप्पूराजा’, ‘मेयरसाब’, ‘हिंदुस्तानी’, ‘चाची ४२०’ अशा तामिळमधून हिंदीकडे आलेल्या चित्रपटांमुळे कमल हसन हा अष्टपैलू, बहुरूपी, मेहनती व बुद्धिवान अभिनेता आहे, अशा निर्माण झालेल्या प्रतिमेचा प्रत्यय त्याने आज ‘विश्वरूपम’ या आपल्या आगामी चित्रपटासंदर्भात बोलताना दिला. आजची त्याची मुंबई भेट ही खास करून ‘विश्वरूपम’ या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या पूर्वप्रसिद्धीला सुरुवात करण्यासाठी होती. दोनच दिवसांपूर्वी त्याने चेन्नई येथे संगीतकार इलय्याराजा यांच्या हस्ते ‘विश्वरूपम’च्या तमिळ आवृत्तीच्या संगीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन केले. त्या वेळी तब्बल १५ हजारांचा जनसमुदाय चेन्नईच्या मैदानावर उपस्थित होता.
‘विश्वरूपम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व प्रमुख भूमिका कमल हसन याचीच आहे. या वेळी तो म्हणाला, ‘चित्रपटनिर्मितीचा मला अजिबात कंटाळा येत नसून सतत कार्यमग्न राहणं व त्या कामाचा आनंद मिळवणं हेच माझ्या पन्नाशीपार फिटनेसचे रहस्य आहे. अजूनही आपण युवा अभिनेत्रींसोबत काम करण्यास मानसिक व शारीरिकदृष्टय़ा फिट असून या चित्रपटामध्ये पूजा कुमार या तमिळ अभिनेत्रीसोबत भूमिका करण्याचा भरपूर आनंद लुटला. दिग्दर्शक के. बालचंदर माझे व रजनीकांत दोघांचेही गुरू आहेत. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. तरीदेखील व्यावसायिक पातळीवर काही नियम असतात. तेथे मात्र रजनीकांत हा माझा चांगला व तगडा स्पर्धक आहे. तरीदेखील मी नेहमीच त्याच्या यश व आरोग्यासाठी त्याला शुभेच्छा देत असतो. शिवाजी गणेशन व दिलीप कुमार हे माझे अभिनयातले गुरू असून मी मात्र कोणाचा गुरू असावे इतपत प्रगती केलेली नाही. दिलीप कुमारला बरेचजण कालच्या पिढीचे नायक मानतात. मी मात्र त्यांना ते अजूनही भावी पिढीचे आदर्श अभिनेते आहेत’, असे मानतो, असे कमल हसनने सांगितले.
‘विश्वरूपम’ हा चित्रपट चित्रपटगृहांबरोबरच ‘डायरेक्ट टू होम’ या पद्धतीनेही प्रदर्शित होणार असला तरी आपल्या देशातील चित्रपट रसिक नेहमीच घरातील छोटय़ा पडद्यापेक्षा चित्रपटगृहाच्या मोठय़ा पडद्यावरच चित्रपटाच्या मनोरंजनाचा आनंद घेण्यास उत्सुक असतात. या चित्रपटासाठी आपण दोन गाणीदेखील गायली असून नृत्यदिग्दर्शक बिरजू महाराज यांच्या दिग्दर्शनाखाली ठुमरीदेखील साकारली आहे, असेही कमल हसन याने सांगितले.
या चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत असून ११ जानेवारी रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.