उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदराशेजारी पाणजे व जेएनपीटी बंदर यांच्यामधील खाडीत गेल्या अनेक दिवसांपासून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या फ्लेिमगोसह इतर जातींच्याही अनेक पक्ष्यांनी हजेरी लावलेली आहे.या फ्लेिमगोंचा अभ्यास करणारे पक्षीमित्र तसेच पक्षी निरीक्षकांनीही पाणजे परिसरात गर्दी केलेली आहे. गेली अनेक वष्रे हे पक्षी रशिया, सबेरिया आदी भागात घटत्या तपमानामुळे भारतात येतात. यामध्ये प्रामुख्याने लेसर फ्लेिमगोंची संख्या अधिक असल्याची माहिती पक्षीप्रेमी निरंजन राऊत यांनी दिली.
जेएनपीटी बंदराशेजारील पाणजे खाडीतील मासे व किडे हे परदेशी पक्ष्यांचे खाद्य असल्याने या परिसरात शेकडो जातीचे देशी व परदेशी पक्षी येतात. त्यांच्यापाठोपाठ पक्षी निरीक्षकांचे थवेही येथे जमू लागले आहेत. आता खाडी किनाऱ्यावरील या जागेत जेएनपीटीने चौथे बंदर उभारण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मातीचा भराव होण्याची शक्यता असल्याने गेल्या अनेक वर्षांचा असलेला या पक्ष्यांचा बसेराही उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पक्षीमित्र व अभ्यासकांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच पक्षीमित्रांनी केंद्रीय वन मंत्रालयाकडे पक्ष्यांसाठी सुरक्षित पाणथळ निर्माण करण्याची मागणी केली आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या मोसमात उरणमधील फुंडे परिसरात तसेच न्हावा-शेवा पोलीस ठाणे परिसरात सबेरिया, रशिया आदी देशातून फ्लेिमगो, नॉब्रेन शॉवेलर डक, रॅडीश सेल डक, वेडर्स,मार्श हॅरीयर, लाकर्स, पेंडर स्टॉक, स्पून बिल, सँड पायर, आयबी तसेच पानकोंबडी आदी ६०-७० जातीचे पक्षी हजारोंच्या संख्येने या भागातील मिठागरांच्या जागेत येत आहेत. त्यामुळे या परिसरात या काळात पक्षीमित्रांना अभ्यास व परीक्षणाची संधी प्राप्त होत होती. जेएनपीटी व पाणजे खाडीत दरवर्षी येणाऱ्या हजारो परदेशी पक्ष्यांच्या संख्येवर येत्या काळात होऊ घातलेल्या जेएनपीटीच्या चौथ्या बंदराप्रमाणेच राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी न्हावा-शिवडी सागरी सेतूच्या उभारणीमुळेही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे मत पक्षीप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.