पुणे शहरात हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, नाशिक शहरातील काही मतदारांमध्ये या स्वरूपाची धास्ती व्यक्त होत आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक असताना शहर व परिसरातील काही मतदारांच्या नावाला कात्री लागल्याचे पुढे आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, एकाच भागातील जवळपास दीड ते दोन हजार जणांची नावे गायब झाल्यामुळे त्यामागे काही षड्यंत्र आहे की काय, अशी साशंकता मतदारांकडूनच व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी पुणे शहरातील हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे निदर्शनास आले. अनेक वर्षांपासून मतदान करणारे आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणाऱ्या मतदारांना यादीतून वगळले गेले. त्यावरून पुणेकरांमध्ये निर्माण झालेला रोष अद्याप कायम आहे. पुण्यातील या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, नाशिकच्या मतदारांकडून त्याच स्वरूपाची साशंकता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील घटनेनंतर नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील इंदिरानगर हा तसा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर. या भागातील जवळपास दीड ते दोन हजार नागरिकांची नावे यादीतून गायब झाल्याचे निदर्शनास आल्याचे शैलेश पटेल यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ५२ व ५३ मधील ही नावे आहेत. या ठिकाणी मनसेचे तीन व शिवसेनेचा एक असे चार नगरसेवक आहेत. या प्रकाराची कुणकुण लागल्यावर नगरसेविका वंदना बिरारी यांच्या कार्यालयात नागरिकांची एकच गर्दी झाली. अनेक नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत नसल्याचे सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वानी मतदान केले होते. आतापर्यंत मतदान यादीत असणारी नावे अचानक कशी गायब झाली, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला.
या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून जिल्हा निवडणूक शाखेकडे तक्रारही केली जाणार आहे. काही जणांनी आधी या संदर्भात विचारणा केली असता निवडणूक यंत्रणेने दुबार नावे काढून टाकण्यात आल्याचे सांगितले होते. दुबार नावे काढून टाकली असती तर एका ठिकाणी नाव असणे आवश्यक होते, परंतु मतदार यादीत तसे नाव दिसत नसल्याचे पटेल यांनी सांगितले. नाव गायब झालेल्यांमध्ये २५ वर्षांपासून मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्यांचा जसा समावेश आहे, तसेच निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असणाऱ्याही काही नागरिकांचा सहभाग आहे. या एकूणच घटनाक्रमामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. मनसे, शिवसेना व भाजप या पक्षांचे नगरसेवक असणाऱ्या भागात अधिक प्रमाणात हे प्रकार घडले आहेत, हे विशेष.