विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने अखंड भारत दिनानिमित्त सक्करदरा चौकात विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी एकासुरात वंदे मातरम् गीत सादर करून देशभक्तीमय वातावरणाची निर्मिती केली. मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहरातील विविध शाळांतील मुले सकाळी सक्करदरा चौकात एकत्र आल्यानंतर विद्याथ्यार्ंसह शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन एकासुरात वंदे मारतम् गीत सादर केले. यावेळी विविध क्रांतीकारकांच्या वेषभूषेत विद्यार्थी सजून आले होते. क्रांतीकारकांना देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा वंदे मातरम् या गीतानेच मिळाली होती. विविध शाळांतील मुले गणवेशात एकत्र आल्यानंतर भारत माता की जय.. वंदे मातरम्च्या घोषणा देण्यात आल्यानंतर सामूहिक वंदे मातरम् शहर दुमदुमले.
 डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. छोटू भोयर, नीता ठाकरे, रीता मुळे, किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे, कैलाश चुट, सुनंदा नाल्हे, माजी पोलीस अधिकारी सुरेश लांबट, प्रकाश मासुरकर, प्रकाश देऊळकर, डॉ. राजेश गादेवार आदी मान्यवर उपस्थित होते. सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमात पं. बच्छराज व्यास विद्यालय, प्रेरणा कॉन्व्हेंट, केशवनगर शाळा, सरस्वती शिशु मंदिर, लोकांची शाळा आदी दक्षिण आणि पूर्व नागपुरातील शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, वंदे मातरम् हे गीत नसून ती या देशातील प्रत्येक नागरिकांची प्रेरणा आहे. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकामध्ये देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे. वंदे मातरम्चे सामूहिक गायन हा राष्ट्रीय समर्पण सोहळा आहे. प्रत्येकामध्ये देशाविषयी स्वाभिमान जागृत झाला पाहिजे त्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे डॉ. मिश्रा म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटू भोयर यांनी तर संचालन अभिजित मुळे यांनी केले.