नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून एका कोळसा कंपनीच्या विजेश रामरतन गुप्ता व अंजली गुप्ता (रा. वाठोडा लेआऊट) या दोन मालकांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी त्यांच्या मंगलम कोल कंपनीमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून हर्षद राजेंद्र घोटाळे (रा. श्रीकृष्णनगर) यांच्याकडून बारा लाख रुपये घेतले. यादव नारायण जळगावकर यांच्याकडून दहा लाख रुपये व चंद्रकांत लक्ष्मण तेलमासरे यांच्याकडून २९ लाख ५० हजार रुपये घेतले. २०१० मध्ये या रकमा घेऊनही त्याचा परतावा न दिल्याने घोटाळे यांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार केली.
अन्य घटनेत बँकॉकमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ३ लाख ८० हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी परवीन अजीजखान (रा. दिल्ली) या महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नागपूरच्या मरियमनगरधील जेव्हिअर आरिकदास पिल्ले यांना बँकॉकमधील हॉटेलमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष तिने दाखविले होते.