बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याने २०१२-१३ च्या गळीत हंगामात तीन लाख ६३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून हंगामाची सांगता केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.
या कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता २५०० मेट्रिक टन प्रतिदिन असताना या हंगामात १२० दिवसांत तीन लाख ६३ मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ७५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. सरासरी साखर उतारा १०.३५ टक्के मिळाला. दैनंदिन गाळप सरासरी प्रतिदिन ३१८६ मेट्रिक टन करून १३५ टक्के गाळप क्षमतेचा वापर केला. द्वारकाधीश साखर कारखान्याची सह वीज निर्मिती प्रकल्प क्षमता १० मेगाव्ॉट आहे.
प्रकल्पातून या हंगामात महावीज वितरण कंपनीस एक कोटी १५ लाख युनिट वीज वितरित करण्यात आली.
दुष्काळी परिस्थिती असतानाही या कारखान्याने गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करून उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला. कार्यकारी संचालक, ऊस विकास अधिकारी, लेखाधिकारी, मुख्य अभियंता आदींनी ऊस उपलब्धतेसाठी अधिक प्रयत्न केले.
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २१०० रुपये प्रति मेट्रिक टन दर या कारखान्याने दिला आहे. कारखान्याने दुष्काळी परिस्थितीचा विचार करून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना विशेष बाब म्हणून अनुदानित तत्त्वावर २०१२-१३ च्या हंगामात ऊस लागणीसाठी प्रमाणित ऊस बेण्याचा पुरवठा केला.
याशिवाय उत्कृष्ट प्रतीचे सेंद्रिय खत हेक्टरी ३० गोणी सवलतीच्या दरात दिले. ऊस उत्पादकांना शासनाने सुधारित धोरणाप्रमाणे ठिबक सिंचनासाठी प्रति हेक्टरी ३० हजार रुपये अनुदान दिले. गळीत हंगामाच्या समारोपाप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, शकुंतला सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत, काँग्रेस कार्यकर्ते वसंत निकम यांच्या हस्ते कारखान्याला अधिकाधिक ऊस पुरवठा करणारे शेतकरी, ऊसतोडणी मुकादम यांना गौरविण्यात आले.