बंदुकीचा धाक दाखवत पळवून नेलेल्या इनोव्हा कारची शहरात विक्री करू पाहणाऱ्या तीन चोरटय़ांना येथील पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून कार, बंदूक आणि तीन भ्रमणध्वनि असा सहा लाखाचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या अटकेमुळे धाकदपटशा दाखवून रस्त्याने जाणारी वाहने पळवून नेण्याच्या काही घटनांचा छडा लागण्याची शक्यता उपअधिक्षक महेश चिमटे यांनी व्यक्त केली.
आठ नोव्हेंबरच्या रात्री मुंबई येथील महफूज रहेमान हे इनोव्हा कारने पत्नीसह मालेगावकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात तीन जणांनी कार अडवली. प्रारंभी त्यांनी बंदुकीचा धाक दाखवल्यामुळे हे दाम्पत्य भेदरले. त्यानंतर दाम्पत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून या तिघांनी कार पळवून नेली. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान येथून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात मंगळवारी रात्री काही जण चोरीच्या वाहनाचा सौदा करणार असल्याची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला असता बनावट नंबरप्लेट लावून चोरी केलेल्या कारचा सौदा करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले. परवेज रज्जाक सय्यद (२४, रा.शिंदेगाव,नाशिक) दीपक सर्जेराव आहेर (२६) आणि गोरख नाना देसले(२१) दोघे रा. गिरणा डॅम, नांदगाव अशी त्यांची नावे आहेत. ही कार रहेमान यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.