शहरातील वेगवेगळ्या भागातून सहा अल्पवयीन बालकांचे अपहरण झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असतानाच पुन्हा एकदा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात या स्वरुपाचे तीन प्रकार घडल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पवयीन मुले व मुली गायब होऊ लागल्याने या प्रकारात एखादी टोळी सक्रिय झाली की काय, अशी साशंकता व्यक्त केली जात आहे.
शहर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच दोन अल्पवयीन मुलींसह एकूण चार जणांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असताना अल्पवयीन मुलेही बेपत्ता होऊ लागल्याने यंत्रणाही धास्तावली आहे. त्यातच पुन्हा या स्वरुपाचे तीन गुन्हे नव्याने दाखल झाले आहेत. नाशिकरोड भागातील वास्को गार्डन परिसरात राहणाऱ्या दशरथ कांबळे यांचा १२ वर्षीय मुलगा आकाश बुधवारी शाळेत जाण्याची तयारी करत होता. बाहेर मित्राने आवाज दिला म्हणून थोडावेळ फिरून येतो असे सांगत घरातून बाहेर पडला. मात्र शाळेत जाण्याची वेळ झाली तरी तो परत आला नाही. मित्रमंडळी, नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतरही तपास न लागल्याने पालकांनी त्याला कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार नाशिकरोड पोलीस स्थानकात दिली आहे. गंजमाळ परिसरातील रॉयल हेरिटेज येथे राहणाऱ्या प्रकाश जाधव यांची १७ वर्षांची मुलगी ५ जानेवारी २०१४ रोजी घराबाहेर पडली. ती परत आलीच नाही. याबाबत सर्वत्र चौकशी केल्यानंतर भद्रकाली पोलीस स्थानकात ‘बेपत्ता’ असल्याची नोंद करण्यात आली. दरम्यानच्या काळात तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना उपनगर परिसरात घडली. २१ मार्च २०१४ रोजी नारायण निरभवणे याचा मुलगा प्रवीण सकाळी साडेनऊ वाजता बाहेर पडला. मात्र रात्री उशीरापर्यंत तो घरी आला नाही.
याबाबत कोणाकडून तपास न लागल्याने पालकांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात शहरात फसवणूक, मारझोड, लुटमार, घरफोडी, फसवणूक असे प्रकार घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस यंत्रणेने धडक मोहीम पुन्हा सुरू करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.