ठाण्यातील विशेष केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या न्यायालयाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तिघांवर वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. विठ्ठल पाटील, रणजित शरण सॉ आणि राजू गौडा अशी या तिघांची नावे आहेत. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. ए. वाली महम्मद यांनी या तिघांना दोन हजार रुपये दंडही केला आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेने वाशी आणि चेंबूरमधील दोन हॉटेल्सवर धाडी टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी दोन बोगस गिऱ्हाईके कुबेर रेस्टॉरंटमध्ये पाठवली होती. नंतर त्यांना साईछत्र हॉटेलमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी छापा घालून या हॉटेलमधून २१ युवतींची सुटका केली. त्यानंतर चेंबूरमधील एका घरावरही छापा टाकला. तेथेही १३ मुलींची सुटका करण्यात आली. या घरात मुलींची छायाचित्रे असलेले अल्बम आणि पावणे पाच लाखांची रोकड सापडली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेचे वकील विजय साळी यांनी हे पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यामध्ये विठ्ठल पाटील, रणजित शरण सॉ आणि राजू गौडा या तिघांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली; तर जसबीर कौर, प्रमोद सॉ, बिभाष रॉय आणि संपा रॉय यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली.  आरोपी परवेझ अन्सारी अद्याप फरारी आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेशन शाखेने ठाणे जिल्ह्य़ात टाकलेला हा पहिला छापा होता. त्यामध्ये तीन आरोपींना शिक्षा झाली.