एकाच परिसरात राहात असल्याने त्या तिघांची एकमेकांशी ओळख होती. समवयीन असल्याने त्यांची गट्टी जमली. एकदा या तिघांनी प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला आणि ठरल्याप्रमाणे तिघेही एकमेकांना ठाणे पूर्व (कोपरी) स्थानक परिसरात भेटले. त्यापैकी एक मित्र थोडय़ाच वेळेत परत येतो, असे सांगून निघून गेला. त्यामुळे तिथेच त्याची वाट पाहात दोघे उभे होते. या दोघांपैकी एकजण कुत्र्यांना बिस्किटे देत असताना त्याने एका लहान मुलास बिस्कीट दिले. पण ते या दोघांच्या चांगलेच अंगलट आले आणि लहान मुलांना पळविणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयावरून दोघांना मंदिराऐवजी तुरुंगात जावे लागले. विशेष म्हणजे, या घटनेविषयी काहीच माहिती नसलेल्या तिसऱ्या मित्रालाही आता या प्रकरणात तुरुंगाची हवा खावी लागणार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा सविस्तर तपास करताना कोपरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा घटनाक्रम समोर आला आहे.
ठाणे येथील पूर्व परिसरात अंकित देवकाते, योगेश रवींद्र तेलुरे आणि त्यांचा एक मित्र राहात असून या तिघांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरविले. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजता तिघेही ठाणे पूर्व स्थानक परिसरातील चेंदणी कोळीवाडा भागात एकमेकांना भेटले. त्यापैकी एकाला काही महत्त्वाचे काम आठवले. त्यामुळे तो थोडय़ाच वेळात परत येतो, असे सांगून निघून गेला. उर्वरित दोघे त्याची वाट पाहात तिथेच उभे होते.
या दोघांपैकी एका मित्राने बिस्कीटचा पुडा विकत घेतला आणि तो कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घालत होता. त्यावेळी तिथे जवळच राहणारा एक अडीच वर्षांचा मुलगा तिथे आला. या मुलासही त्यांनी खाऊ म्हणून बिस्कीट दिले आणि त्यानंतर तो मुलगा बिस्कीट घेऊन तिथून घरी निघून गेला. दरम्यान, हातातील बिस्कीट पाहून वडिलांनी मुलाकडे विचारणा केली. त्यावेळी दोन तरुणांनी बिस्कीट दिल्याचे सांगताच ते मुले पळविणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय त्याच्या वडिलांना आला. ते लगेचच शेजाऱ्यांना घेऊन ‘त्या’ तरुणांच्या दिशेने जाऊ लागले. मुलाच्या वडिलांसोबत येणाऱ्या नागरिकांचा ताफा पाहून दोघे भेदरले आणि त्यांनी तेथून धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
या घटनेमुळे पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. दरम्यान, मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, पण त्यामध्ये प्राथमिक तपासात हा घटनाक्रम समोर आला, अशी माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या मित्राचा शोध घेत आहेत. याशिवाय या तिघांचा मुले पळविणाऱ्या टोळीशी संबंध आहे का, याची पुन्हा खातरजमा करीत आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.