एक रुपयाचा वाद कायम
उपनगरी प्रवासाचे भाडे पाच रुपयांच्या पटीत झाल्यावर तिकिटांच्या खिडक्यांवरील सुटय़ा पैशाचे वाद कमी झाले असून तिकीट क्लार्क आनंदी झाले असले तरी जेटीबीएसवर तिकीट घेणाऱ्यांचे आणि देणाऱ्यांचे वाद वाढू लागले आहेत. कारण पाच रुपयांचे तिकीट सहा आणि १० रुपयांचे तिकीट ११ रुपयांना खरेदी करावे लागते. या वाढीव एक रुपयाचा वाद केवळ तिकीट खिडकीवरून आता जेटीबीएसवर गेला आहे, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

उपनगरी प्रवासाच्या तिकिटांच्या रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाय केले असले तरी प्रवाशांच्या मागचे हे शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही. खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी सीव्हीएम, एटीव्हीएम आणि एक रुपया जास्त देऊन सुरू झालेली ‘जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक’ योजना राबवूनही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.
मुळात बुकिंग कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असून त्या भरण्यास अद्याप रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. मध्य रेल्वेवर सध्या २७४  बुकिंग क्लार्कच्या जागा रिक्त आहेत. पश्चिम रेल्वेवरही अनेक जागा रिक्त असून त्या भरण्यात आलेल्या नाहीत.
रांगा कमी करण्यासाठी सीव्हीएम आणि एटीव्हीएमचा पर्याय पुढे आला. सीव्हीएमची कुपन्स रांगेशिवाय घेता येतात. ही मशीन्स सातत्याने बिघडू लागल्यावर एटीव्हीएमचा पर्याय आला. या मशीन्स मोठय़ा प्रमाणात उपनगरी स्थानकांवर बसविण्यात आल्या असून आणखीही काही मशीन्स लावण्यात येणार आहेत. असे असूनही सर्वच स्थानकांवर असलेल्या तिकीट खिडक्या, सीव्हीएम मशीन्स, एटीव्हीएम यांच्यापुढे रांगा कायम असल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वेने रांगा कमी करण्यासाठी खासगी व्यक्तींना तिकिटांचे कंत्राट देण्याची योजना सुरू केली. तिकीटाच्या रकमेपेक्षा माणशी एक रुपया जास्त देऊन तुम्हाला तिकीट घेता येते. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते थेट कसारा-कर्जत आणि पनवेल-रोहा पर्यंत सुमारे एक हजार जणांना हे कंत्राट देण्यात येणार असले तरी प्रत्यक्षात केवळ १२१ जणांना सध्या कंत्राट देण्यात आले आहे. बुकिंग क्लार्कच्या कमी संख्येमुळे बंद झालेल्या खिडक्यांवर पर्याय म्हणून याच योजनेला प्राधान्य देण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दररोज मध्य रेल्वेवर तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या नऊ लाख १३ हजार इतकी असून त्यातील एक लाख १४ हजार सीव्हीएमद्वारे, एक लाख ४६ हजार एटीव्हीएमद्वारे तर ७३ हजार प्रवासी जेटीबीएसद्वारे तिकीट काढतात. पाच लाख ७५ हजार प्रवासी अद्यापही तिकीट खिडकीवर जाऊन रांगेतून तिकीट काढत असून या रांगा कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दररोज विविध प्रकारे तिकीट विक्री होण्याचे प्रमाण
मध्य रेल्वे
सीव्हीएम : १२.५ टक्के
एटीव्हीएम : १६ टक्के
जेटीबीएस : ८ टक्के (१२१ ठिकाणी योजना सुरू)
पश्चिम रेल्वे
सीव्हीएम : १७.६ टक्के
एटीव्हीएम : ५.७८ टक्के
जेटीबीएस : ०.५ टक्के (चार ठिकाणी योजना सुरू)
मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वेगवेगळे निर्णय
सीव्हीएम कुपन्स खरेदी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर वेगवेगळे निर्णय घेण्यात आल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. सीव्हीएम कुपन्स घेण्यासाठी मध्य रेल्वेवर तिकीट खिडक्यांवर रांगेतून जावे लागते तर पश्चिम रेल्वेवर रांगेशिवाय कुपन्स मिळू शकतात. ही कुपन्स लवकरात लवकर बंद करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले असून पश्चिम रेल्वेवर ती चालूच राहणार आहेत. मध्य रेल्वेने सध्या जेटीबीएसवर जास्त भर दिला असून पश्चिम रेल्वेने जेटीबीएसपेक्षा एटीव्हीएमवर भर दिला आहे.