अर्बन व्हिजन समूह आणि आयडिया लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत बोरिवली आणि पवई येथे कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोरिवली येथे उभारण्यात आलेल्या ‘टायर अ‍ॅम्फी थिएटर’मध्ये ‘विश प्लाझा’या नावाने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
अर्बन व्हिजन समूहाच्या संचालिका आदिती नरगुंदकर-पाठक यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, मुंबईतील मोकळ्या जागांचा विधायक कामांसाठी वापर व्हावा, त्या त्या भागातील नागरिक येथे एकत्र यावेत, या उद्देशाने बोरिवली आणि पवई येथील या मोकळ्या जागांचा वापर आम्ही कल्पकतेने करून घेतला आहे. बोरिवली येथे काही टायर्सचा वापर करून तेथे ‘टायर अ‍ॅम्फी थिएटर’ तयार करण्यात आले आहे. येथे एका वेळी ४० प्रेक्षक बसू शकतील. या जागेला आम्ही ‘विश प्लाझा’ असे नाव दिले आहे. पवई येथे मोकळ्या जागेवरील एका जुन्या शेडचा आम्ही आमच्या उपक्रमासाठी उपयोग करून घेणार आहोत. या जागेला आम्ही ‘प्लाझा जॉय’ असे नाव दिले आहे. शहरात अशा मोकळ्या जागा असाव्यात आणि त्या त्या भागातील लोकांसाठी उपक्रम आयोजित केले जावेत, असा आमचा प्रयत्न आहे. २४ ते २७ तारखेदरम्यान बोरिवली आणि पवई येथे होणाऱ्या कार्यक्रमात चित्रकार, ग्राफिटी आर्टिस्ट सहभागी होणार असून कार्यक्रम सर्वासाठी खुला असल्याचेही नरगुंदकर-पाठक यांनी सांगितले.