जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी प्रदीप तिवारी यांच्याविषयी सदस्य, नागरिकांच्या आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी असल्यामुळे शासनाने त्यांची जिल्हा परिषदेतून तडकाफडकी बदली करून मत्स्य विभागात बदली केली आहे. तिवारी यांच्या जागेवर महापालिकेतील वित्त अधिकारी सुवर्णा पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश तिवारी यांनी जवळपास दोन महिने काढले नव्हते.  मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. तिवारी यांच्या विरोधात राज्य सरकारकडे तक्रार केली होती. मात्र, राजकीय वरदहस्तामुळे त्यांची बदली केली जात नव्हती. जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तीधारक शिक्षकांनाही वेतन दिले जात नव्हते. तिवारी यांच्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारी बघता राज्य शासनाने बुधवारी रात्री त्यांच्या बदलीचे आदेश काढले. तिवारी यांची नागपूरमध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या वित्त अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली असून महापालिकेच्या वित्त अधिकारी सुवर्णा पांडे यांची जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागाचे अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. पांडे शुक्रवारी पदभार स्वीकारणार आहेत.