ठाणे महापालिका प्रशासनाने यंदा दांडी बहाद्दर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसपासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाची परवानगी डावलून दीर्घकाळ रजेवर राहणे, विभागनिहाय चौकशीच्या फेऱ्यांत सापडलेल्या अधिकाऱ्यांना यंदा बोनस मिळणार नाही, असा फतवा आयुक्त असीम गुप्ता यांनी काढला आहे. त्यामुळे १२,५०० रुपयांच्या सानुग्रह अनुदानाकडे डोळे लावून बसलेल्या या कामचुकार कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी बोनसविनाच काढावी लागणार आहे.
यंदाच्या दिवाळीत निवडणुकीची धामधूम असेल हे लक्षात आल्याने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये तर कंत्राटी कामगारांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाणे महापालिकेत दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचा आकडा बराच मोठा आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या कामात हयगय केल्याबद्दल चौकशी ओढावून घेणारे कामचुकार कर्मचारी गेली अनेक वर्षे सानुग्रह अनुदानाचा फायदा घेतात, असा अनुभव होता. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर विनाकारण आर्थिक भार पडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच आयुक्त असीम गुप्ता यांनी अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना यंदा या अनुदानापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार नाही असे परिपत्रक महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी काढले आहे.
६० पेक्षा अधिक दिवस परवानगीशिवाय गैरहजर असल्यामुळे विभागीय चौकशी ओढवून घेणारे कर्मचारी, दीर्घकाळ रजेवर तसेच विभागीय चौकशीत शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार नाही, असे आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय प्रत्यक्ष कामावर हजर असलेल्या दिवसांच्या प्रमाणावर सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. महापालिकेच्या या निर्णयामुळे दांडीबहाद्दर कर्मचारी सानुग्रह अनुदानापासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दिवाळीनंतर सानुग्रह अनुदान
ठाणे महापालिकेने विधानसभा निवडणुकीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्षात मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना अजूनही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. विधानसभा निवडणुकीचे काम आणि दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांच्या परिपत्रकामुळे सानुग्रह अनुदानाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी महापालिकेस उशीर झाला.
त्याचा फटका अधिकारी-कर्मचाऱ्यांना बसला असून त्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान मिळू शकलेले नाही. यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाइल बंद होता. दरम्यान, दिवाळीच्या सानुग्रह अनुदानासंबंधी आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल अधिकारी-कर्मचारी संघटनेने केली आहे.