ठाणे शहरातील नागरी सुविधा अनेक अंगांनी बिघडलेल्या असताना सार्वजनिक वाहतुकीसारखे महत्त्वाचे अंग ‘टीएमटी’ गाडय़ांतील मुजोर, बेपर्वा आणि निर्दयी चालक -वाहकांमुळे सडू लागले आहे. टीएमटीच्या बसचालक- वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना रोजच भोगावा लागत आहे. प्रवाशांकडून केल्या जात असलेल्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात असल्याने चालक-वाहकांच्या बेशिस्त, बेलगाम आणि उद्दामपणाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ‘रस्त्यावरचे राजे’ असल्याच्या थाटात इतर वाहनांवर कुरघोडी करणे, बसस्टॉपवर एक-दोन प्रवासी असल्यास न थांबता tv02पुढे जाणे, स्टेशनजवळील वळणावर प्रवाशांना उतरता येऊ नये यासाठी मुद्दाम वेग वाढवून ‘गोखले रोड’, ‘एक नंबर रेल्वे फलाटा’वर जाऊ इच्छिणऱ्या प्रवाशांना कुंजविहापर्यंत फरफटत नेणे, या टीएमटीच्या चालकांनी जोपासलेल्या ‘छंदां’चा फटका प्रवाशांना होत आहे. सुटय़ा पैशांचा आदेश देणारे अन् त्यावरून हमरी-तुमरीवर येऊन प्रवाशांना उतरविण्याची धमकी देणारे वाहक पाहिले की, ‘टीएमटी’च्या गाडय़ा ठाण्यातील प्रवाशांसाठी, की चालक-वाहकांच्या उद्दामतेच्या बारमाही प्रदर्शनासाठी हा प्रश्न निर्माण होतो.

तोटय़ात चाललेली टीएमटी बससेवा ढिसाळ नियोजनामुळे आणखी गाळात रुतत चालली आहे. वाट पाहात असताना इच्छित बस न येणे आणि एकाचवेळी शर्यत लावल्यासारख्या एकाच ठिकाणी जाणाऱ्या तीन-चार रिकाम्या बस पाहणे हे ठाणेकरांना टीएमटीचे दैनंदिन दिसणारे दृश्य आहे. त्यातही रस्त्यावरील इतर वाहनांना चिरडण्याच्या आवेशात टीएमटीच्या गाडय़ा रस्त्यांवरून ‘राज्य’ करताना दिसतात. टीएमटीवरील प्रवाशांची विश्वासार्हता खालावत चालली असल्यामुळेच ‘सिट रिक्षां’चा पर्याय ठाणेकर नागरिक अधिक स्वीकारत आहेत.
‘तक्रार दाखल’चा दिखावा
चाळीस हजारांहून अधिक रिक्षा असूनही तो प्रवास परवडत नसल्यामुळे टीएमटीतून लाखो प्रवासी प्रवास करतात. वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पुस्तिका उपलब्ध आहे. मात्र नियोजित स्थळी पोहोचण्याची घाई असलेल्या नागरिकांना लेखी तक्रारींनी आपली गाऱ्हाणी सादर करायची असल्यास निव्वळ त्या (अविश्वासार्ह) पुस्तिकेचाच पर्याय उपलब्ध आहे. लेखी तक्रार घेऊन पीडित प्रवाशाला वागळे आगार गाठावे लागते. वागळे आगारापर्यंत जाण्यापेक्षा कित्येक नागरिक कुठलीही तक्रार न करता चालकांच्या दैनंदिन अन्यायाचा सामना करीत सहिष्णू वृत्तीचे टोक गाठतात. कित्येक प्रवाशांना तक्रार पुस्तिका आहे, याची माहिती नसल्यामुळे मुजोर चालक-वाहकांच्या बेलगाम ‘छंदां’मध्ये वाढ होत चालली आहे.
प्रवाशांनी काय करावे?
वाहक आणि चालकांकडून कोणत्याही प्रकारचा उद्दाम, लहरीपणा निदर्शनास आल्यास ठाणे स्थानकाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामध्ये संबंधित बसचा क्रमांक आणि वेळ यांची माहिती तक्रार पुस्तिकेत लिहावी. त्या तक्रारींचा क्रमांक आपल्याकडे घेऊन संबंधित तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली, याचा पाठपुरावा करावा. टीएमटीच्या बससेवा मुजोर-चालकांसाठी नसून करदात्या नागरिकांसाठी आहेत. त्यामुळे त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला असून, तो पूर्ण होत नसल्यास वागळे आगार येथे रीतसर लेखी तक्रारी नोंदवाव्यात.
दोषींवर कारवाई केली जाते..
ठाणे परिवहन बस सेवा किंवा वाहक-चालकांविषयी प्रवाशांच्या काही तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाते. संबंधित वाहक चालकांना रीतसर नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येतो. त्यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते, अशी माहिती ठाणे परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.

प्रवासी म्हणतात..
ठाणे स्थानकामध्ये बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता कित्येक ‘संताप’जनक कैफियती समोर आल्या.
* टीएमटी’ तोटय़ात चालली असली, तरी चालक -वाहकांचा माज आणि तोरा प्रचंड असतो. काही विशिष्ट ठिकाणच्या तीन रिकाम्या बस एकाच वेळी जाताना दिसतात, तर काही ठिकाणच्या बसेस अर्धा तास प्रवाशांना ताटकळत ठेवूनही येत नाहीत
* सर्वात कमी तिकीटदर पाच रुपये असून, सुटे पाच रुपये नसतील तर उतरवू असे सांगणारे काही वाहक आहेत.
* सर्व प्रवाशांनी रिक्षाचा पर्याय निवडल्यास या बससेवा चालू शकतील काय? टीएमटी कायमच्या बंद पडल्या तर तळ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ‘रिक्षांचे शहर’ म्हणून ओळख झाली, तरी चालेल, किमान प्रवाशांचे हाल कमी होतील..
* तक्रार करूनही चालक आणि वाहकांच्या वृत्तीत कोणताही फरक जाणवलेला नाही. त्या तक्रारींचे पुढे काय होत ते कळतही नाही
*  कित्येकदा चालक स्टेशनवरील चौकाच्या वळणावरून बस इतकी भरधाव नेतात, की रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १ किंवा गोखले रोडवर जाऊ इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ‘कुंजविहार’पर्यंत निव्वळ चालकाच्या लहरीपणामुळे फरफटत जावे लागते. तरुण मुले-मुली जीव मुठीत घेऊन या वळणावर उडय़ा मारून उतरतात. त्यातून अपघातही होऊ शकतात