पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला राहिल्यास डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला वारंवार दिला जात असला तरी अनेक कारणांमुळे स्वतच उपचार करण्याकडे अनेकांचा कल असतो. औषध विक्रेत्यांकडे जाऊन सातत्याने औषध मागणाऱ्या या रुग्णांना क्षयरोगही असण्याची शक्यता असते. या रुग्णांची माहिती व्हावी व त्यांच्यापर्यंत औषधउपचार नेता यावेत यासाठी पालिका आता औषध विक्रेत्यांचीच मदत घेणार आहे. याबाबत नुकतेच कुर्ला येथील ३० औषध विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून प्रत्येक विभागातील औषध विक्रेत्यांचेही प्रशिक्षण येत्या काळात होईल.
बलवीर पाशा को एड्स होगा क्या.. अशा आक्रमक जाहिराती व प्रतिबंधक उपचारांची माहिती देणाऱ्या मोहिमांमधून एचआयव्हीसारख्या प्राणघातक आजाराला काबूत करण्यात यश आले असले तरीही औषध उपलब्ध असणाऱ्या क्षयरोगाला आवर घालण्यात मात्र आपल्याला फारसे यश मिळालेले नाही. आजही आजारांनी होणाऱ्या मृत्यूंमध्ये क्षयरोगाचे प्रमाण सर्वाधिक असून इतर सर्व आजारांच्या एकत्रित मृत्यूंपेक्षा क्षयरोगामुळे दगावलेल्यांची संख्या अधिक आहे. २०१४-१५ या वर्षांत क्षयरोगामुळे ६४९६ मृत्यू झाले असून क्षयरोग झालेल्या प्रत्येक सातव्या रुग्णामधून एकाचा मृत्यू होतो. क्षयरोगाविरोधात आता सर्वच स्तरांमधून मोहिमा हाती घेण्यात आल्या आहेत. औषधांसोबत रुग्णांच्या आहाराचीही काळजी घेतली जात आहे. मात्र क्षयरोगाचे लवकर निदान, तसेच न कंटाळता सर्व औषधे नियमित घेणे हाच क्षयरोगाबाबत सर्वात चांगला उपाय आहे. या दोन्हीबाबत औषध विक्रेत्यांची मदत घेतली जाणार आहे.
क्षयरोगासंबंधीच्या मोहिमेत २००६ पासून औषध विक्रेत्यांना सहभागी करून घेतले गेले. मात्र २०१० मध्ये एक्सएक्सडीआर क्षयरोगाचे रुग्ण आढळल्यानंतर क्षयरोगाविरोधातील मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात सुरू झाली तेव्हा औषध विक्रेत्यांचा सहभाग अधिकच महत्त्वाचा ठरला. सुधारित ‘राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमा’अंतर्गत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ‘ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन आणि इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन’ या दोघांसह २०१२ मध्ये सामंजस्य करार केला. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा औषध विक्रेत्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आता सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत कुर्ला येथील ३० इच्छुक औषध विक्रेत्यांना नुकतेच प्रशिक्षण दिले. यात पालिकेच्या क्षयरोग अधिकारी डॉ. सीमा खराटे, आयपीएच्या उपाध्यक्ष्य मंजिरी घरत आणि समुपदेशक सपना सुरेंद्रन यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला.
वारंवार ताप-खोकल्यासाठी औषध मागण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना ओळखणे, क्षयरोगाच्या चाचणीसाठी त्यांचे मन वळवणे तसेच डॉट प्रोव्हायडर होऊन आठवडय़ातून तीन दिवस नियमित औषधे घेण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करण्याचे काम औषध विक्रेत्यांना करता येईल, असे पालिकेच्या ‘क्षयरोग नियंत्रण विभागा’च्या अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. औषध विक्रेत्यांना त्यांच्या दुकानात क्षयरोगाची माहिती देणारी भीत्तिपत्रकेही लावता येतील. हे काम औषधविक्रेते सामाजिक बांधीलकीमधून करणार आहेत. २०१०-११ मध्येही त्यांचे प्रशिक्षण घेतले गेले होते. मात्र सध्या क्षयरोगाविरोधातील लढा अधिक तीव्र करताना औषध विक्रेत्यांची या कामी मदत होईल, असे मंजिरी घरत म्हणाल्या. कुल्र्यानंतर मालाड, वांद्रे, वरळी येथेही अशा प्रकारे इच्छुक विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण घेतले जाणार आहे.
औषध विक्रेते काय करणार?
’खोकल्यासाठी सतत औषध मागण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये क्षयरोग तपासणीसाठी पाठवणार.
’ संबंधित रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य कार्यकर्त्यांना माहिती देणार.
’ आठवडय़ातून तीनदा घ्यावी लागणारी क्षयरोगाची औषधे केमिस्टच्या दुकानात ठेवली जाणार. रुग्णालय किंवा दवाखान्यात जाण्यात अडचण येणारे रुग्ण येथे नियमित औषधे घेतील.