स्त्रियांच्या ‘हृदया’जवळ असणाऱ्या मंगळसूत्राच्या स्थानात येत्या काळात बदल झाल्यास ते आश्चर्याचे ठरणार नाही. संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सुचलेल्या एका कल्पनेमुळे साखळीचोरांना चापही बसणार आहे.
रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांची मंगळसूत्रे हिसकावून पळून जाणे, ही जवळपास सर्व शहरांतील नित्याची बाब झाली आहे. मोटरसायकलवरून पाठीमागून सुसाट वेगाने येऊन महिलांची मंगळसूत्रे लंपास करणाऱ्या साखळीचोरांचा महिलावर्गाने प्रचंड धसका घेतला आहे. यावर उपाय म्हणून अभिनेत्री श्वेता मेहेंदळे हिने ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ ही अभिनव कल्पना मांडली असून आपल्या नव्या मालिकेतील भूमिकेमध्ये तिने ती अमलातही आणली आहे. साखळीचोरांच्या भीतीपोटी बाहेर जाताना खरे दागिने घालणे महिला टाळू लागल्या आहेत. ‘हृदया’जवळ असणारे मंगळसूत्र मात्र अस्सलच घालण्याकडे त्यांचा कल असतो. नेमकी हीच बाब हेरून साखळीचोर सर्वत्र धुमाकूळ घालत असतात. या पाश्र्वभूमीवर ‘मंगळसूत्र एका वेगळ्या पद्धतीने घालता आले तर?’ असा विचार करून श्वेताने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सखी’ या मालिकेच्या निर्मात्यांना ‘मंगळसूत्र ब्रेसलेट’ची कल्पना सुचवली. या मालिकेमध्ये ती कॉपरेरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या विवाहित स्त्रीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे ऑफिसमधील त्या लुकला हे ब्रेसलेट साजेसे दिसेल, असा विश्वास तिला वाटला. रूढी व परंपरेच्या दृष्टीने मंगळसूत्र हा संवेदनशील विषय असल्याने यावर नकारात्मक प्रतिक्रिया येऊ शकतात, असे वाटल्याने निर्मात्यांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले. मात्र हा बदल प्रेक्षकांना रुचल्याने निर्मात्यांनीही तिची कल्पना उचलून धरली.
विशेषत: महिला प्रेक्षकांना ही कल्पना आवडल्याचे श्वेताने सांगितले. आता कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यास सर्वप्रथम या ब्रेसलेटबाबत महिलांकडून विचारणा होत असल्याचेही ती सांगते. मालिकांमधील व्यक्तिरेखांच्या लुक्सचा अनेक प्रेक्षक, प्रामुख्याने महिला, प्रत्यक्ष आयुष्यात वापर करतात. त्यामुळे येत्या काळात या प्रकारचे अभिनव मंगळसूत्र बाजारात व महिलांच्या मनगटावर ठिकठिकाणी दिसू लागले तर ते नवल नसेल.

गरज ही शोधाची जननी
या ब्रेसलेटची मूळ कल्पना श्वेताच्या मैत्रिणीची होती. लग्नानंतर सोनसाखळी चोरांची भीती तिच्याही मनात होतीच, मात्र खोटय़ा दागिन्यांची अ‍ॅलर्जी होत असल्याने ती खोटे मंगळसूत्रही वापरू शकत नव्हती. यावर उपाय म्हणून तिने मंगळसूत्राच्या पद्धतीचे ब्रेसलेट बनवून घेतले. श्वेताच्या भूमिकेच्या माध्यमातून हे ‘मनगटसूत्र’ आता घराघरात पोहोचले आहे.