ज्ञानेश्वरीतील ९ हजार ३३ या ओवीसंख्येएवढे ग्रंथवाचक, या सर्व ग्रंथवाचकांना भेट म्हणून ज्ञानेश्वरीची प्रत, हजारो भाविकांची निवास-भोजन व्यवस्था, तसेच पारायण सोहळय़ाचा कळसाध्याय म्हणून अमेरिकेच्या नन्सी व पं. उद्धवबापू आपेगावकर यांची सोलो-पखवाज जुगलबंदी असा भव्यदिव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उद्या (बुधवारी) येथे सुरू होत आहे. सोहळय़ाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, संयोजकांनी सायंकाळी नियोजनाचा आढावा घेतला.
संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणाऱ्या या पारायण सोहळय़ासाठी तब्बल ७५ हजार चौरस फुटांचा मंडप उभारला आहे. सभामंडपात पारायणास बसणाऱ्यांची व भाविकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २०० शौचालये-स्नानगृहे उपलब्ध केली आहेत. दररोज सकाळी ७ ते ११ पारायण सोहळा, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ५ संगीत रामायण, सायंकाळी हरिपाठ अशा दैनंदिनीने सोहळा पार पडेल. ५ मार्चपर्यंत रात्री ८ ते १० या वेळेत राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. ४ मार्चला दीपोत्सव व ५ मार्चला अच्युतमहाराज दस्तापूरकर यांचे काल्याचे कीर्तन होईल.
सोहळय़ाच्या नियोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आयोजक संजीवनी मित्रमंडळाचे अध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली. सोहळय़ास राज्याच्या विविध भागांतून वारकरी सांप्रदायातील महत्त्वाची मंडळी, तसेच भाविक मोठय़ा संख्येने दाखल होत असून संपूर्ण सोहळा प्रदूषणमुक्त वातावरणात होईल. कुठेही प्लॅस्टिकचा वापर नसेल. सोहळय़ातील भोजनावळीत प्लॅस्टिक पत्रावळी व द्रोण यांना पूर्ण फाटा दिला आहे. ओडिशातून पळसाच्या पानांच्या पत्रावळी व द्रोण मागवले आहेत. भाविकांसाठी पारायणस्थळी आरोग्य तपासणीस स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. सोहळय़ाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक शिवाजी भरोसे, कृष्णा भरोसे आदी प्रयत्नशील आहेत.