सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे टोलनाक्यावर स्थानिक वाहनचालकांकडून आणि सर्व राजकीय पक्षांनी विरोध केल्यामुळे  टोलवसुली लांबल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र विरोधाचे वातावरण निवळल्याने टोलवसुलीसाठी पूर्ण तयारीत असलेल्या टोल ठेकेदाराच्या खेळीला हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीच्या खोदकामांमुळे आणखी दोन आठवडय़ाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. टोलमधून स्थानिक वाहनचालकांना सवलत मिळावी, याबाबत सर्व पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवर अद्याप निर्णय झालेला नसताना, ठेकेदाराचा टोलवसुलीचा डाव उधळण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले असून हे चित्रदेखील दोन आठवडय़ाने स्पष्ट होईल.
कामोठे टोलनाका येथील मार्गावर लांबलचक खड्डे एचपीसीएल कंपनीने खोदून ठेवल्याने पनवेलकरांचा भविष्यात सुरू होणारा खर्चीक प्रवास अजनू दोन आठवडय़ांनी पुढे ढकलला गेला आहे. परंतु या खोदकामामुळे टोलवसुलीपूर्वीच येथे वाहनांची वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण झाल्याने २७ किलोमीटरच्या मार्गाचा प्रवास अवघ्या तीस मिनिटांत करणे शक्य झाले आहे. यासाठी वाहनांसाठी एका वेळी ३० रुपये, परतीच्या प्रवासासाठी ४५ रुपये, तसेच अवजड वाहनांच्या एका वेळेच्या प्रवासासाठी ११० रुपये व परतीच्या प्रवासासाठी १६५ रुपये आणि मिनीबसच्या एका वेळेच्या प्रवासासाठी ५५ रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी ८३ रुपयांची टोलपावती घेऊनच या गतिमान प्रवासाचा आनंद वाहनचालक व प्रवाशांना घेता येणार आहे. स्थानिक वाहनचालकांना या टोलमधून सूट मिळावी अशी वाहनचालकांची अपेक्षा आहे. पनवेलचे राजकारण याच टोलनाक्याभोवती विधानसभा निवडणुकीपासून फिरत आहे. प्रत्यक्षात स्थानिक वाहनचालकांना या टोलनाक्यात कोण सूट मिळवून देणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. या टोलनाक्याला विरोध करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर या टोलनाक्यातून प्रत्यक्ष वसुली सुरू करण्यासाठी सायन-पनवेल टोलवेज कंपनीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. मात्र त्यामध्येच एचपीसीएल कंपनीने मार्गाच्या मधोमध खोदकाम करून टोलवसुलीला अप्रत्यक्षरीत्या लाल दिवा दाखविला आहे. हे काम सुरू असल्याने सकाळी व सायंकाळच्या वेळेत कामोठे टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झाल्याची पाहायला मिळते. हे खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी हे काम एचपीसीएल कंपनीचे असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितला की, सायन-पनवेल मार्गावरील कामोठे व खारघर या दोन्ही टोलनाक्याला आमचा विरोध कालही नव्हता व आजही नाही. मात्र या टोलनाक्यातून स्थानिक वाहनचालकांना सूट मिळावी ही भूमिका सातत्याने आम्ही घेतली आहे. गेल्या आठवडय़ात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही या संदर्भातील लेखी निवेदन दिले आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण परिसर आणि पनवेलच्या सिडको वसाहतींमधील वाहनचालकांना या टोलमधून सवलत मिळावी, असे त्या निवेदनात नमूद केले आहे. त्याबाबत मंत्री महोदयांनी संबंधित विभागाकडून व टोलवसुली करणाऱ्या कंपनीकडून त्याबाबतची माहिती घेऊन त्याबाबतचा लोकहिताचा सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. टोलवसुलीपूर्वीच या टोलनाक्यांमधून स्थानिकांच्या वाहनांच्या टोलसवलतीचा निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.