दसरा आणि शनिवार-रविवारच्या सुट्टय़ांमुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या तसेच मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील सर्व टोलनाके सज्ज झाले आहेत. मुंबईतील टोलदरात काही प्रमाणात वाढ करण्यात आल्याने टोलनाक्यांवर वाहनचालक व टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात काही ठिकाणी वाद होत आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन या सर्व टोलनाक्यांवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान २ ऑक्टोबरच्या सुट्टीच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी सायंकाळपासूनच मुंबईकरांनी बाहेर जाण्यासाठी सुरुवात केली असून दहिसर टोलनाक्यावर रात्री उशिरापर्यंत वाहनांची रांग लागली होती.
टोलनाक्यांवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांबरोबरच टोल दिल्यानंतर सुट्टय़ा पैशांमुळे वाहनचालकांचा खोळंबा होऊ नये म्हणून सुट्टे पैसे, पाच रुपयांच्या चलनी नोटा यांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. दहिसर टोलनाक्यावर रात्री उशिरापर्यंत दीड ते दोन किलोमीटर अंतराची वाहनांची रांग लागली होती.