विधानसभा निवडणुकीआधी अगदीच सामान्य भाव मिळत असलेल्या कांद्याला निवडणुकीनंतर आता कुठे बरा भाव मिळू लागल्याने उत्पादकांमध्ये काहीसे समाधान पसरले असताना आता टोमॅटोला कवडीमोल भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांमागील ससेमिरा मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. टोमॅटोला जिल्ह्यात मिळणाऱ्या भावातून बाजारपेठेपर्यंतचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांमध्ये असंतोष पसरला आहे.
दिवाळीच्या सुटीनंतर बाजार समित्यांचे व्यवहार पुन्हा सुरू होताच टोमॅटो उत्पादकांना प्रचंड हादरा बसला. पिंपळगावसह जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनमाड बाजार समितीत तर दोन ते तीन रुपये किलो असा भाव मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले असून, घसरणारे भाव पाहून हवालदिल झालेल्या काही शेतकऱ्यांनी तर टोमॅटो न विकताच घरचा रस्ता धरणे पसंत केले. मनमाड बाजार समितीत सोमवारी ४०, तर मंगळवारी ३५ कॅरेट टोमॅटोची आवक झाली. त्यांना ४० ते १०० रुपये म्हणजेच सरासरी ५० ते ६० रुपये कॅरेट असा भाव मिळाला. एका कॅरेटमध्ये २० किलो टोमॅटो बसतात. लिलाव सुरू होताच अडते व दलालांनी चांगल्या दर्जाच्या टोमॅटोचे भावही ८० रुपये कॅरेटपर्यंतच येऊ दिले. टोमॅटोला कमी भाव मिळण्याची स्थिती जिल्ह्यात सर्वत्र आहे. पिंपळगाव बसवत बाजार समितीतही कमी भावामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पिकांना सातत्याने कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या गप्पा सर्वच राजकीय पक्षांनी मारल्या होत्या, परंतु वास्तवात एकही पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीआधी कांद्याचे दर घसरले होते. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा हा परिपाक असल्याची टीका केली होती, तर नाशिक येथे झालेल्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्याला मिळणाऱ्या कमी भावासाठी केंद्राला दोष देणे योग्य नसल्याचे म्हटले होते. कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. निवडणुकीनंतर कांदा उत्पादकांना बऱ्यापैकी भाव मिळू लागला. आता खरोखर शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा सुरू होताच टोमॅटोला मिळत असलेल्या कमी दरामुळे आता टोमॅटो उत्पादकांवर दु:ख व्यक्त करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर येण्याच्या तयारीत सर्व जण गुंतले असल्याने टोमॅटो उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास सध्या तरी कोणत्याच लोकप्रतिनिधीस वेळ नाही. टोमॅटो उत्पादकांची ही स्थिती असताना डाळिंब उत्पादकांची परवड सुरूच आहे. त्यामुळे राज्यातील नवीन सरकार कृषीविषयक कोणती भूमिका घेते, त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.