समाजाने झिडकारलेल्या अशा वस्तीमधून वयाची सहा वषार्ंची असताना दोन छोटय़ा भावंडांना घेऊन आश्रमात आल्यानंतर काकाजींनी आम्हा बहीण-भावांवर आईवडिलांसारखे प्रेम केले आणि संस्कार करून वाढविले, शिक्षण दिले, स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. एकीकडे आम्ही भावंडं त्या वस्तीतून बाहेर पडल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करीत असताना आमच्या आईचे काय? ही चिंता सतत मनाला भेडसावत होती. त्यामुळे तिलाही आम्ही त्या वस्तीतून बाहेर काढले आणि आज आईला सोबत घेऊन सुखी जीवन जगत आहोत.. आश्रमात लहानाची मोठी झालेली सोनू (बदलले नाव) भरभरून बोलत होती. 

ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून सोनूच्या जीवनाचे वास्तव आहे. नागपुरातील एका आश्रमामध्ये वाढलेल्या मात्र आज स्वत:च्या पायावर उभी राहून कुटुंबासह एकत्र राहत असलेल्या सोनूशी संवाद साधला असता तिने सांगितले, माझा आणि भावंडांचा जन्म केव्हा झाला ते माहिती नाही. मात्र, ज्या वस्तीमध्ये आम्ही राहत होतो. त्या वातावरणात माझ्या मुलांनी राहावे नाही आणि माझ्यावर जी वेळ आली ती त्यांच्यावर येऊ नये म्हणून तिने आम्हा भावडांना काकाजींच्या स्वाधीन केले. त्यावेळी माझे वय सहा वर्षांंचे होते. माझ्यापेक्षा दोन लहान भाऊ असून त्यापैकी एकाचे वय ४ तर सर्वात लहान अडीच वर्षांचा होता. दोन खोल्या असलेल्या आश्रमात काकाजींनी आम्हाला आणल्यावर त्यावेळी काहीच कळत नव्हते. मात्र, जसजसे दिवस जात होते तसे आम्हाला कळायला लागलं. माझे आणि भावडांचे आश्रमाजवळ असलेल्या एका शाळेत शिक्षण सुरू झाले. काकाजी आमचे आईवडील असल्यामुळे काही लागले किंवा अडचणी आल्यानंतर त्यांच्याजवळ सांगत होते. त्यांनी आमच्यावर संस्कार करून वाढविले. माझे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर पुढे कोणते शिक्षण घ्यावे ते कळत नव्हते. विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण घ्यावे, असे वाटत होते. मात्र, मी अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, अशी काकाजींची इच्छा होती. मात्र, त्यामुळे त्यांनी शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेतला. दोन लहान भावांचे शिक्षण सुरू होते. त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हीलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काहीच कळत नव्हते. शालेय शिक्षण घेत असताना पहिला क्रमांक कधी सोडला नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांला नापास झाले. आता काकाजी आपल्याला काय म्हणणार, ते रागावतील असे वाटले होते. मात्र, आश्रमात आल्यानंतर त्यांनी काहीच न बोलता अतिशय शांतपणे पुढे अजून जोमाने अभ्यास कर, असे सांगितले. नापास झाल्याचा ठपका लागल्यानंतर लगेच विविध विषयांच्या शिकवणी वर्ग लावून जोमाने अभ्यासाला लागले, रोज आठ ते दहा तास अभ्यास सुरू केला. अनेक मैत्रिणी माझ्या आश्रमात येत असल्यामुळे सोबत अभ्यास केला. मात्र, त्यानंतर कधीही नापास झाले नाही. तीन वर्षांची पदविका घेतल्यानंतर महाविद्यालयात कॅम्पस मुलाखती झाल्या आणि त्यामध्ये एका खासगी कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. ज्या कंपनीत काम करीत आहे ती मोठी कंपनी असून मला चांगले वेतन मिळत आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आईला आम्ही त्या वस्तीतून बाहेर काढले होते. मला नोकरी लागल्यानंतर आश्रमातून बाहेर पडले आणि स्वत:चे घर केले. आज आम्ही तिघे भावंड आईसोबत राहून सुखी जीवन जगत आहोत. एक भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे तर दुसरा एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. ज्या समाजाने मला आणि माझ्या भावंडाला घडविले त्या समाजाला काही देणं आहे. त्यामुळे माझ्या सारख्या मुलांचा सांभाळ करून त्यांना समाजाचा एक चांगला नागरिक बनविण्यासाठी मी आणि माझे कुटुंब काम करणार आहे. समाजांनी झिडकारलेल्या अशा वस्तीची ओळख आमच्या जीवनातून आता मिटली असून समाजातील एक चांगला नागरिक म्हणून जीवन जगताना वेगळा आनंद आहे. माझ्या आणि कुटुंबातील बदल हा केवळ काकाजींमुळे झाला असून ते आमच्यासाठी देव आहेत, अशी भावना तिने व्यक्त केली.