ठाणे, कळव्यातील मुख्य चौकात आणि महामार्गावर टुरिस्ट वाहनांमुळे होणारी ही कोंडी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने शहरात एखादा टुरिस्ट डेपो उभारता येईल का, याची नव्याने चाचपणी सुरू केली आहे. अशा प्रकारे टुरिस्ट वाहनांना थांबा मिळावा यासाठी ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात कोणतेही आरक्षण नाही. हे आरक्षण नसल्यामुळे अशा प्रकारच्या डेपोसाठी भूखंड अस्तित्वात नाही. त्यामुळे या डेपोसाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नव्याने आरक्षण टाकण्याची कसरत शहर विकास विभागाला करावी लागणार असून यासंबंधीचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या गळी उतरविण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनाला पेलावे लागणार आहे.
निमुळते रस्ते..नियोजनाचा अभाव..चौकाचौकात होणारी वाहतुकीची कोंडी आणि वाहतूक पोलिसांना वाकुल्या दाखवत मुख्य चौकांमध्ये होणारे टुरिस्ट बसगाडय़ांचे अतिक्रमण. ठाण्याची अस्मिता वगैरे मानल्या जाणाऱ्या टेंभीनाक्यासारख्या अतिशय अरुंद भागात आकाराने भल्या मोठय़ा बसेस उभ्या असतील तर या भागातील वाहतुकीचे चित्र नेमके कसे असेल, याची कल्पनाही न केलेली बरी. यावर उपाय म्हणून टुरिस्ट डेपोची संकल्पना विचारधीन आहे.
ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू झाल्यानंतर आयुक्त असीम गुप्ता यांनी विकास नियंत्रण नियमावलीत काही मोठे बदल आखले आहेत. याशिवाय वेगवेगळ्या सुविधांसाठी भूखंड आरक्षित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. असे असताना बाहेरगावी जाणाऱ्या टुरिस्ट गाडय़ांसाठी नेमका थांबा कुठे असावा यासंबंधीचे कोणतेही निकष अद्याप आखण्यात आलेले नाहीत. सद्यस्थितीत पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन हात नाका, नितीन कंपनी, टेंभी नाका आणि कळवेकरांसाठी कळवा नाका, अशा काही ठिकाणी टुरिस्ट बसगाडय़ांना थांबा निश्चित करण्यात आला. मात्र, महामार्गावरील तीन हात नाका आणि नितीन कंपनी जंक्शन हे पूर्व-पश्चिम वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे चौक आहेत. त्यामुळे या चौकात उभ्या राहणाऱ्या टुरिस्ट बसेसमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येते. ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परवाना नूतनीकरणासाठी येणाऱ्या मोठय़ा ट्रक आणि अवजड वाहनांमुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील एक पदरी रस्ता यापूर्वीच अतिक्रमित केल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलिसांनी हरकत घेऊनही हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महामार्गावर मुख्य चौकात रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या टुरिस्ट बसेसमुळे कोंडी आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अंतर्गत भागात टेंभी नाका परिसरात अतिशय निमुळत्या रस्त्यावर दिवस-रात्र या टुरिस्ट बसेस उभ्या असतात. त्यामुळे या भागातील वाहतुकीचे अक्षरश: तीनतेरा वाजत असल्याचे चित्र आहे. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना हे थांबे सोयीचे ठरत असले तरी शहरातील अंतर्गत वाहतुकीवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.
नवा थांबा..नवा डेपो
यातून मार्ग काढण्यासाठी ठाणे पोलिसांनी मध्यंतरी टुरिस्ट बसेससाठी स्वतंत्र डेपो तयार करावा, अशा स्वरूपाची सूचना पुढे आणली होती. या सूचनेवर महापालिकेने गांभीर्याने विचार सुरू केला असून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी यासाठी एखादी जागा निश्चित करता येईल का, यासंबंधी प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखडय़ात अशा प्रकारे खासगी बसगाडय़ांच्या डेपोसाठी कोणतेही आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही. अवजड वाहनांसाठी यापूर्वी पूर्व द्रुतगती महामार्गावर ज्युपिटर रुग्णालयालगत टर्मिनस स्वरूपाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, खासगी बसेसच्या डेपोसाठी असे कोणतेही नियोजन नाही. या स्वरूपाचे नियोजन व्हावे याकरिता महापालिका प्रशासनावर दबाव वाढू लागला असून यामुळे टुरिस्ट डेपोसाठी नव्याने आरक्षण टाकता येईल का, याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. विकास आराखडय़ात अशा प्रकारे जागेचे आरक्षण केल्यास डेपो उभारण्याची प्रक्रिया सुलभ होईल, असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, ठाणे, कळवा परिसरातील प्रवाशांना सुलभ होईल, अशी जागा शोधण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. अशा स्वरूपाच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे, मात्र जागेची निश्चिती अद्याप झालेली नाही, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली.