पावसाळी पर्यटनाचा ट्रेंड सध्या वाढतो आहे. फेसाळणारे धबधबे आणि समुद्राच्या उंच लाटा झेलण्यासाठी तरुणांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होत आहे. सुट्टीचा दिवस निर्सग सान्निध्यात घालविण्यासाठी पर्यटकांकडून त्याचे नियोजन करण्यात येत आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील पर्यटकांना जवळ असलेला उरण येथील पिरवाडी किनारा सध्या खुणावत असून, हा स्पॉट पर्यटकांसाठी विकेण्ड डेस्टिनेशन बनू पाहत आहे.  विकेण्डला पर्यटकांची गर्दी वाढत आहे. यामुळे येथील स्थानिकांसाठी रोजगार निर्माण होऊ लागला आहे.
उरणचा पिरवाडी किनारा वन डे पिकनिकचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. याच किनाऱ्यावर असलेल्या दग्र्यावर मुंबई, ठाणे, पुणे तसेच नवी मुंबईतील अनेक जण येऊन राहत आहेत. पनवेल व उरणमधील स्थानिक नागरिक या किनाऱ्यावर शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी करू लागले आहेत. प्रत्येक सणाच्या दिवशी तर पिरवाडी समुद्रकिनारा पर्यटकांनी फुललेला असतो. सध्या मोठय़ा उधाणामुळे निर्माण होणाऱ्या लाटा अंगावर झेलण्यासाठी अनेक जण या ठिकाणी येत असतात. समुद्रकिनारा लहान असला तरी नवी मुंबईसह रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, पेण तालुक्यांसाठीचा हा एकमेव किनारा आहे. त्यामुळे या किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. किनाऱ्यावर ओएनजीसीसारखा संवेदनशील प्रकल्प असल्याने काही बंधने असली, तरी किनाऱ्यावरील मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. किनाऱ्यावरील स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून, नागाव परिसरात हॉटेल्सचीही संख्या सध्या वाढू लागली आहे.  हॉटेल्समध्ये राहण्याचीही व्यवस्था आहे.  परिसरातील आगरी समाजाच्या पारंपरिक पद्धतीचे जेवण देणारी छोटी छोटी हॉटेल्सही असल्याने स्थानिक पदार्थाचाही आस्वाद या ठिकाणी घेता येत आहे.

पिरवाडीला येण्यासाठी या मार्गाने यावे
* खासगी वाहनाने उरण शहरातून ओएनजीसी येथून पिरवाडी समुद्राकडे येता येते.
* उरण एसटी आगारात उरतरल्यानंतर उरण चारफाटा येथून रिक्षाने या समुद्रकिनाऱ्यावर येता येते.
* आनंद लुटा पण जरा जपून हा समुद्रकिनारा छोटा असून येथील जेट्टी उद्ध्वस्त झालेली आहे. जेट्टीच्या अवषेशांमुळे किनारा पोहण्यासाठी धोकादायक असून, सावधानता बाळगून मजा लुटण्यास हरकत नाही.