काश्मीरखालोखाल स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे कुलू-मनाली! रोहतांग पास, सोलंगनाल, वसिष्ठ कुंड, हिडिंबा मंदिर अशा विविध पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मनालीमध्ये वीणाज् वर्ल्डच्या पर्यटकांच्या एका तुकडीतील काही पर्यटक मात्र तीन दिवस हॉटेलमध्येच बसून आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये खासगी वाहतूकदारांचा संप झाल्यामुळे रोहतांग पास किंवा सोलंगनाल येथे जाण्यासाठी वाहने नसल्याने या पर्यटकांवर ही वेळ ओढवली आहे. मात्र, वीणाज् वर्ल्डला संपाची माहिती होती, तर त्यांनी सहल रद्द का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत यापैकी एका पर्यटकाने उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
हमखास आनंददायी प्रवासाची हमी देणाऱ्या वीणाज् वर्ल्ड या पर्यटन संस्थेतर्फे सध्या ७७२ पर्यटक हिमाचल प्रदेशात आहेत. त्यापैकी काही तुकडय़ा मनालीमध्ये असून त्यापैकी तीन दिवसांपूर्वी मनालीत पोहोचलेल्या तुकडीतील काही प्रवाशांनी वीणाज् वर्ल्डच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आम्ही सिमला येथे होतो, त्याच वेळी मनालीतील वाहतूकदारांच्या संपाची बातमी समजली होती. त्याच वेळी ही सहल रद्द करणे आवश्यक होते. तरीही आम्हाला येथे आणण्यात आले. त्यानंतर गेले तीन दिवस आम्हाला वाहतूकदारांच्या संपाच्या नावाखाली हॉटेलमध्येच बसवून ठेवण्यात आले, असा आरोप या तुकडीतील एक पर्यटक प्रफुल्ल सोनटक्के यांनी केला.
या संपाबद्दल आगाऊ कल्पना असताना आम्हाला मनाली येथे आणण्याऐवजी धरमशाला, नैनिताल येथे नेणे अपेक्षित होते. तसेच याबाबत वीणाज् वर्ल्डच्या अधिकाऱ्यांशी अथवा वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचेही सोनटक्के म्हणाले.

पर्यटकांनी परिस्थिती समजून घ्यावी!
वाहतूकदारांचा संप ही आमच्याही हातातील गोष्ट नाही. हिमाचल प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा तो परिपाक आहे. असे संप आयत्या वेळी रद्द होतात, ही गोष्ट आपल्याला नवीन नाही. त्यामुळे सहल रद्द करण्याचा निर्णय घेणे शक्य नव्हते. या तुकडीनंतरही अनेक तुकडय़ा मनाली येथे पोहोचल्या आहेत. त्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन मनालीतील उर्वरित पर्यटन स्थळे पाहत आनंद लुटला आहे. या संपाविरुद्ध कोणतेही पाऊल उचलून वीणाज् वर्ल्ड पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आणू शकत नाही. त्यामुळे या पर्यटकांनीही परिस्थिती समजून घेत सहकार्य करावे.
    – वीणा पाटील, संचालिका (वीणाज् वर्ल्ड)