कुटुंब व्यवस्था आपल्या परंपरेचा केंद्रबिंदू आहे, परंतु परिस्थितीनुरूप होणारे बदल स्वीकारून ही परंपरा खंडित होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्याच्या सांस्कृ तिक काळात या संबंधाने आपली जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या हाती आलेली ही परंपरा आपण पुढील पिढीत संक्रमित केली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.
शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या डॉ. बाबा नंदनपवार लिखित ‘सुंदर माझे घर’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संचालक डॉ. दिलीप गुप्ता, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का,  प्रवचनकार विवेक घळसासी, अरिवद खांडेकर, माजी आमदार अशोक मानकर उपस्थित होते. घर हे रचना करून होत नाही तर ते आपोआप घडते. कुटुंब आणि घर या शब्दातून परंपरेचे वेगळेपण लक्षात येते. आजची पिढी कोणतीही गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाही. नव्या पिढीच्या प्रश्नांना मूळ परंपरा न सोडता आत्मविश्वासाने समोर गेले पाहिजे. प्रश्न संपले नाही त्याचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे हे समजून घेऊन शुद्ध स्वरूपात कुटुंब परंपरा पुढे नेणे काळाची गरज आहे. असे सांगणारे समाजात आहे. पूर्वी संस्कार हे घरातच होत होते. परंतु आता संस्कारवर्गाचा जमाना आला आहे. असे सांगून ते म्हणाले प्रत्येक संकटप्रसंगी चिंतन करणारा वर्ग असतो. त्याचे आपण घटक असले पाहिजे, असे भय्याजी जोशी यांनी सांगितले. या पुस्तकाची निर्मिती कशी झाली याचे विवेचन डॉ. दिलीप गुप्ता यांनी केले. प्रा, अरविंद खांडेकर यांनी हे पुस्तक म्हणजे घरातील नंदादीप आहे असे सांगून मन, अंत:करण जोडण्याचे सामथ्र्य या पुस्तकात आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. बाबा नंदनपवार यांनी अतिथींचा परिचय करून दिला. संचालन तन्वी नंदनपवार हिने केले.