कल्याणचा शिवाजी चौक गणेशोत्सवाच्या काळात सकाळपासूनच गर्दीने ओसंडून वाहत असतो. कुंभारवाडय़ातून गणेशमूर्ती घेऊन या शिवाजी चौकात पोहोचल्यानंतर तिथे मावळ, पुणे आणि नाशिक परिसरातून आलेले ढोलवाले या गणपती घेऊन जाणाऱ्या मंडळींची वाट पाहत असतात. त्यानंतर मूर्ती मंडळाच्या मांडवापर्यंत आणताना काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची सुपारी मिळाल्यानंतर हे ढोलवाले कार्यरत होतात. कोणताही ताल आणि ठेका नसलेली ही मंडळी ढोल बदडू लागल्यानंतर या आवाजावर गणेश मंडळाचे कार्यकर्तेही अचकटविचकट नाचायला सुरुवात करतात आणि ध्वनिप्रदूषणाच्या निर्मितीमध्ये हातभार लावतात. एकसुरी आणि कर्णकर्कश आवाजांनी आजूबाजूचा परिसर भरून जातो. ढोलांचा हा आवाजही डीजेंच्या वरताण असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.  
डीजे डॉल्बीच्या दणदणाट आणि अचकटविचकट नृत्याने भरलेल्या उत्सवातील मिरवणुकींना पर्याय मिळावा म्हणून ढोलताशांच्या वादनामध्ये मिरवणुका काढण्याची प्रथा पुण्याप्रमाणेच गेली काही वर्षे मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये रुजू लागली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे आणि मावळमधून अनेक ढोलवाल्यांनी ही शहरे गाठून व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात नाक्यानाक्यांवर या ढोलवाल्यांचे जथेच्या जथे दिसू लागले आहेत. संस्कृती आणि परंपरेचा आव आणणाऱ्या या ढोलवाल्यांची आता डीजेच्या आवाजासोबत स्पर्धा होऊ लागली असून त्यामुळे यांचे डेसिबल्स वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोणत्याही प्रकारच्या ताल आणि सुराशिवाय केवळ मोठा आवाज या एकमेव निकषावर हे ढोलवाले आपला व्यवसाय करीत आहेत. हजारो रुपयांचे मानधन अथवा सुपारी देऊन हे पारंपरिक ढोल मिरवणुकांमध्ये वाजविले जातात. काही अतिउत्साही तरुण तर कोणत्याही शास्त्रीय अभ्यासाशिवाय ढोल पथकांच्या निर्मितीमध्ये केवळ यातील पैसा पाहून उतरू लागले आहेत. त्यांचा रात्री-बेरात्री होणारा सराव अनेक मंडळींना त्रासदायक ठरू लागतो. त्यामुळे डीजेंच्या बरोबरीनेच धांगडधिंगाणा करणाऱ्या ढोलवाल्यांनाही रोखण्याचे आवाहन नागरिक करू लागले आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली शहरांत काही तरुण शिस्तबद्ध ढोल पथके उभारून विधायक पद्धतीने मिरवणुका काढण्यासाठी प्रयत्नशील असले तरी त्यांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. मर्यादित संख्या आणि ढोलांचे तालात सुमधूर वादन केल्याने त्याचा नागरिकांना त्रास होत नसल्याचा दावा ही ढोल पथके करीत आहेत. डोंबिवलीतील आरंभ, कल्याण शहरातील शिवदुर्ग ही अशा सुमधूर वादनासाठी ओळखली जाणारी पथके आहेत. मिरवणुकीमध्ये ढोल पथकांच्या वादनाप्रसंगी डीजे आणि डॉल्बीसुद्धा बंद केली जात असल्यामुळे अशा चांगल्या पथकांमुळे ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण येऊ लागले असल्याची माहिती आरंभ ढोल पथकाच्या प्रीती गोसावी यांनी दिली.