शिमगोत्सव हा देशातील सर्वात मोठा सण असला तरी कोकणातील खेडय़ापाडय़ांतील या उत्सावाचा रंग काही औरच असतो. खेडय़ापाडय़ांत होळीपूर्वी आटय़ापाटय़ाचा खेळ रंगत असे. होळी सणातील हा खेळ सध्या नामशेष झाला आहे. तर वाढत्या शहरीकरणामुळे जागेचा अभाव व गवत तसेच लाकूडफाटय़ाच्या कमतरतेमुळे प्रतीकात्मक होळीची प्रथाही अनेक ठिकाणी बंद पडली आहे. मात्र अनेक गावांतून धुळवडीच्या दिवशी घरोघरी जाऊन शिमगा मागताना आजही हातात पत्र्याचा, प्लास्टिकचा डबा वाजवला जातो, त्या वेळी ‘आयन का बायना, घेतल्याशिवाय जायना’ची आरोळी मात्र कायम आहे.
अनेक ठिकाणी रंगांची उधळण करणारा म्हणून होळी आणि धुळवडीचा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यात हा सण प्रथा आणि पंरपरेनुसार साजरा केला जात असे. या कालावधीत शेतीची कामे पूर्ण झाल्याने भातशेतीतील पेंढा व गवत मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होत असे. त्याचप्रमाणे लाकूडफाटाही मोठय़ा प्रमाणात असल्याने अनेक गावांत माळावर होळीच्या आठवडाआधी तरुणाईची सरबराई सुरू व्हायची. दररोज सायंकाळी होळी लावण्याच्या जागी होळीची छोटी प्रतिकृती तयार करून ती लावण्याची प्रथा होती. याच ठिकाणी आटय़ापाटय़ा हा खेळ खेळला जायचा. खासकरून या खेळात महिला सहभागी होत असत. मात्र आठवडाभर प्रतीकात्मक होळी लावण्यासाठी व आटय़ापाटय़ाचा खेळ या दोन्ही गोष्टींसाठी सध्या उरण तालुक्यातील गावांत जागा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे तरुणाईही शहर परिसरात कामधंद्यात अडकल्याने त्यांना वेळ मिळत नाही. परिणामी या प्रथा बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे सध्या होळीत केवळ धुळवडच साजरी केली जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे.