महापालिकेच्या कचखाऊ भूमिकेमुळे शांतता क्षेत्रात जिल्हा रुग्णालयालगत उभारल्या गेलेल्या मूर्ती गाळ्यांमुळे त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडीचा श्रीगणेशा झाला आहे. या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात शुक्रवारी मोडक सिग्नल ते मायको सर्कल पर्यंतच्या दोन्ही बाजुचे मार्ग सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उपरोक्त काळात केवळ गणेशमूर्तींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना हे र्निबध लागू राहणार नाहीत.
गणेशोत्सवाची जय्यत तयारी सर्वत्र सुरू झाली असून ठिकठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात गणेशमूर्ती गाळे लावण्यात आले आहे. त्र्यंबक रस्त्यावर गाळ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीला लागून तसेच समोरील भागात गाळे उभारण्यात आले आहे. वास्तविक, हा भाग शांतता क्षेत्रात येतो. न्यायालयाच्या निर्देशानुसार शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदुषणास मज्जाव आहे. याची कल्पना देत पोलीस यंत्रणेने त्र्यंबक रस्त्यावरील गाळ्यांना आक्षेप नोंदविला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत पालिकेने परिसरात गाळे उभारण्यास हिरवा कंदील दाखविला आणि त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येत भर टाकली. मूर्ती पहाण्यासाठी येणारे भक्त रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. यामुळे त्र्यंबक रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
गणेश चतुर्थीपर्यंत हे संकट सोडविणे पोलीस यंत्रणेलाही शक्य नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट स्वरुप धारण करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने किमान त्या दिवसासाठी खबरदारीची उपाययोजना केली आहे.
शुक्रवारी मोडक सिग्नल ते भवानी चौक (मायको सर्कल) पर्यंतच्या परिसरातील कार्यालये, दवाखाने, नागरी वस्ती व इतर सर्व ठिकाणी जाण्यासाठी तसेच भवानी सर्कल (मायको सर्कल) येथून मोडक सिग्नल पर्यंत येण्याकरिता गणेश मूर्तीची वाहतूक करणारे वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना मोडक सिग्नल ते भवानी सर्कल पर्यंतचा मुख्य मार्ग दोन्ही बाजुने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतुकीचे हे र्निबध कायम राहतील. वाहनधारकांनी याच भागातील इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.