लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना जिल्हाधिकारी कार्यालयावर गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा बरीच दक्षता घेत असली तरी बुधवारी समर्थक व उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे या कार्यालयासमोरील रस्त्यावरील वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. कार्यालयाबाहेर शेकडो वाहने उभी असल्याने रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या इतर वाहनधारकांना अडचणीतून मार्ग काढावा लागला.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार व समर्थकांची गर्दी होणार असल्याने पोलीस यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता दुभाजकावर बांबूंची संरक्षक जाळी उभारली आहे. तसेच अर्ज सादर करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारासमवेत केवळ पाच जणांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश दिला जातो. कार्यालयाच्या बाहेरील परिसरात समर्थकांची गर्दी होऊ नये याची फेरीला परवानगी देतानाच काळजी घेतली जात आहे. महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या फेरीला बी. डी. भालेकर मैदानापर्यंत परवानगी देण्यात आली. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संबंधित उमेदवाराने पाच जणांसमवेत येऊन अर्ज दाखल करणे क्रमप्राप्त होते, परंतु नेमक्या याच वेळी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी बसपाचे उमेदवार आणि दिंडोरीसाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी झाली होती.
या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कार्यालयात फारसा कोणाला प्रवेश मिळाला नसला तरी बाहेरील गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात दुचाकी वाहने नेण्यास मज्जाव करण्यात आला होता.
परिणामी, रस्त्याच्या कडेला २०० ते ३०० वाहने उभी करण्यात आली होती. ही बाब परिसरात वाहतूक कोंडी निर्माण करण्यास कारक ठरली.