वाशी खाडीपुलाचे मागील दोन आठवडय़ांपासून सुरू झालेले काम मुदतीपूर्वी दोन दिवस अगोदर झाल्याने या पुलावरून नवी मुंबईत येणारी वाहतूक रविवारपासून सुरू झाली असून, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अखेर १२ दिवसांनंतर सुटकेचा नि:श्वास टाकला. वाशी खाडीपुलाच्या सांधे दुरस्तीसाठी मध्य प्रदेशहून विशेष अभियंत्यांचे पथक आले होते. पुलाची ही सांधे दुरुस्ती लवकर केल्याने भविष्यात होणारी मोठी दुर्घटना टळली आहे.
वाशी खाडीपुलावरील खांब क्रमांक १५ आणि १९ वर टाकण्यात आलेल्या तुळईतील जोडणी खराब झाली होती. त्यामुळे पुलाच्या स्पंदनात मोठी वाढ झाली होती. ही सांधे दुरुस्ती लवकर केली नसती, तर एखाद्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते, असे स्थापत्य अभियंत्याचे मत आहे. त्यामुळे १८ नोव्हेंबरपासून २ डिसेंबपर्यंत या पुलाच्या डागडुजीची परवानगी मुंबई व नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडे मागण्यात आली होती. त्यात नवी मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी जबाबदारी होती. या पुलावरून नवी मुंबई, पुणे, गोव्याकडे जाणारी सर्व वाहतूक मुलंड-ऐरोली खाडीपूलमार्गे ठाणे बेलापूर मार्गावरून वळविण्यात आली होती. त्यामुळे जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा अगोदरच ताण वाढलेल्या बेलापूर मार्गावर या अतिरिक्त वाहतुकीमुळे दुप्पट वाहनांचा ओघ सुरू झाला होता. त्यासाठी सत्तरपेक्षा जास्त वाहतूक पोलीस २४ तास तैनात करण्यात आले होते. मुंबईहून येणाऱ्या वाहतुकीला प्रथम वाट करून देताना नवी मुंबई पोलिसांनी १२ दिवस ठाणे-बेलापूर मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद ठेवली होती. त्यामुळे सेकंदाला वाहने धावत असल्याचे दृश्य होते. अखेर रविवारी दुपारी ही सांधे भरणी झाल्यानंतर या मार्गावरून वाहतूक खुली करण्यात आली. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही वाहतूक सुरुळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी चांगली आखणी केली होती. त्यामुळे १२ दिवसांत कुठेही मोठी कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले नाही. ठाणे-बेलापूर मार्गावर अनेक अंतर्गत रस्ते येऊन मिळत असल्यानेही वाहतुकीवर नियंत्रण करणे एक मोठे आव्हान होते. सायन-पनवेल मार्ग आता सुसाट झाल्याने त्या ठिकाणी अशी स्थिती मात्र आढळून आली नाही. पुलाच्या सांधे जोडणीसाठी मध्य प्रदेशातून विशेष अभियंता पथकाला पाचारण करण्यात आले होते. ही दुरुस्ती वेळीच झाल्याने भविष्यात होणारी दुर्घटना टळली असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर ठाकूर यांनी स्पष्ट केले.