वाहतूक खर्च वाचावा म्हणून शाळा-कॉलेजमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना बिनधास्त दुचाकी वाहन देणाऱ्या पालकांना दंड आणि विद्यार्थ्यांना समज देण्याचा कार्यक्रम नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून हाती घेतला. त्याची सुरुवात नवी मुंबईत एकाच वेळी वाशी, सीबीडी, सी वूड, कोपरखैरणे, ऐरोली येथील शाळांजवळून करण्यात आली असून दुपापर्यंत १३ विद्यार्थ्यांची पोलिसांनी फैलावर घेतले आणि आठ पालकांना दंड ठोठावला आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या या अभिनव कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. विद्यार्थी पालकांबरोबरच शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापक, प्राचार्यानादेखील विद्यार्थ्यांना वाहतूक धडे देण्यास सांगण्यात आले.

मुंबई-ठाण्यात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली जात आहे. त्यासाठी वाहतूक पोलीस अधिकारी शाळा-कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करीत आहेत, मात्र एकीकडे पोलीस वाहतुकीचे नियम समजावीत असताना दुसरीकडे शाळा-कॉलेजमध्ये मोटार सायकल आणणाऱ्या १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. घर ते शाळेपर्यंत वाहतूक करणाऱ्या बसेस, खासगी वाहतूक व्यवस्था यांच्या वाढलेल्या खर्चाला पर्याय आणि विद्यार्थ्यांचा अट्टहास यामुळे पालक विद्यार्थ्यांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी वाहने देत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक शाळा-कॉलेजच्या बाहेर आता सायकल स्टॅण्डबरोबरच मोटारसायकल स्टॅण्ड तयार झाले आहेत. या मोटारसायकलमध्ये विनागियरच्या मोटारीचा जास्त भरणा आहे. मोटारसायकलबरोबर चांगल्या बनावटीचे मोबाइलदेखील पालक-विद्यार्थ्यांना देत आहेत. त्यामुळे मोटारसायकल आणि मोबाइल असे एक घट्ट नाते तयार झाले असून मोटारसायकलवर कानाला हेडफोन लावून हे विद्यार्थी सुसाट ह्य़ा गाडय़ा चालवीत असल्याचे दिसून येते. काही विद्यार्थी तर मान तिरपी करून हा आविष्कार करीत असल्याचे पाहण्यास मिळत आहे, मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
नवी मुंबई पोलिसांनी वाहतूक नियमांचे हे उल्लंघन रोखण्याचे ठरविले असून यासाठी पालकांना दोषी ठरविले आहे. त्यासाठी मंगळवारपासून वाशी येथील साईनाथ विद्यालय, नेरुळ सी-वूड येथील एसआयएस, सीबीडी येथील ज्ञानपुष्प विद्यालय, कोपरखैरणे येथील ज्ञानविकास आणि ऐरोली येथील देशमुख विद्यालय या शाळांसमोर वाहतूक पोलिसांनी सापळा रचला. १८ वर्षांपेक्षा कमी विद्यार्थ्यांना या वेळी हेतुपुरस्पर अडविण्यात आले. या विद्यार्थ्यांकडे लायसन्स तर नव्हतेच पण हेल्मेटचादेखील पत्ता नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना समज देण्यात आली असून त्यांच्या पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती साहाय्यक आयुक्त दिनकर ठाकूर यांनी दिली. वाहन परवाना नसताना वाहन देणारे पालक दोषी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना विनापरवाना वाहन चालविण्याने होणारे नुकसान समजवून सांगण्यात आले. या दोन घटकांबरोबरच शाळा-कॉलेजमधील मुख्याध्यापक, प्रार्चायांनादेखील याची जाणीव करून देण्यात आली.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि विनापरवाना वाहन न चालविण्याचे धडे शिक्षकांनीदेखील देण्याची आवश्यकता या वेळी स्पष्ट करण्यात आली. दुपापर्यंत वाशीतील १३ विद्यार्थ्यांना समज देणाऱ्या पोलिसांना संध्याकाळपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांची ही शाळा घ्यावी लागली. ही कारवाई पुढील १५ दिवस अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.