शहरातील अनेक प्रमुख मार्गासह छोटय़ा-मोठय़ा कॉलन्यांमधील रस्ते अवाढव्य मंडपांमुळे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले असून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्वसामान्यांना वेठीस धरण्याची परंपरा काही गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेच्या पाठबळामुळे कायम ठेवली आहे. महापालिका सार्वजनिक मंडळांना मंडप उभारताना वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घेण्याची अट टाकते. परंतु, नोंदणीची पूर्तता झाल्यावर रस्त्याच्या मधोमध मंडप उभारले गेले तरी पारंपरिक ठिकाण म्हणून त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करते. परिणामी, या पद्धतीने थेट रस्त्यात अवाढव्य आकाराचे मंडप उभारणारी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पालिकेची अनास्था यांच्या कचाटय़ात गणेशभक्त सापडल्याचे चित्र आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे पालटले असून त्यातून सर्वसामान्यांना ‘आनंद कमी अन् त्रास अधिक’ अनुभवयास मिळतो. सध्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर उभारलेले मंडप हे त्याचे उदाहरण. मातब्बर राजकारणी, नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी या उत्सवाच्या माध्यमातून आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करतात. त्याकरिता भव्यदिव्य आकाराची सजावट करण्याकडे बहुतेकांचा कल आहे. त्याचा परिपाक मंडपांचा आकार विस्तारण्यात झाला.
मध्यवर्ती भागातील रस्ते आकाराने लहान असल्याने काही मंडळांनी उभारलेल्या मंडपांनी रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. घनकर गल्ली व आसपासच्या परिसरात वाहनधारकांना जायला रस्ता शिल्लक नाही. अशोकस्तंभ, मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळा, काठेगल्ली, पंचवटीतील आडगाव नाका अशा बहुतेक भागात स्थानिक मंडळांनी उभारलेल्या मंडपांमुळे एकतर रस्ता पूर्णपणे किंवा अंशत: वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मंडपाची उभारणी करताना संबंधित पदाधिकाऱ्यांनी त्याचा वाहनधारक व स्थानिकांना त्रास होऊ शकतो याचा विचार केल्याचे दिसत नाही.
अशा मंडपांनी वाहतुकीला अडसर निर्माण करणारी बहुतेक गणेश मंडळे ही बडय़ा राजकीय पुढाऱ्यांची आहेत. त्यांनीही भव्य मंडपांमुळे वाहतूक बंद होईल, अडथळे येतील याची चिंता केली नाही. या मंडपांमुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना अन्य पर्यायी मार्गाने मार्गक्रमण करावे लागते. काही मंडळांनी १० ते १५ दिवस आधीपासून मंडप उभारून आपली सजावट चालविली. म्हणजे गणेशोत्सवाच्या दहा दिवसांबरोबर आधीपासून संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले. यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुकीचा ताण पडला आहे. रविवार कारंजा ते अशोकस्तंभ यातील लहान-मोठे रस्ते बंद असल्याने महात्मा गांधी रोड, रेड क्रॉसलगतचा रस्ता, अशोकस्तंभाहून रविवार कारंजाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी ही बाब ठळकपणे लक्षात येते.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवांची नोंदणी महापालिका करते. ही नोंदणी करताना महापालिकेने नियमावली आखून दिली आहे. परंतु, पालिकेची नियमावली दरवर्षी केवळ कागदोपत्री राहते. संबंधित मंडळांनी अटी व शर्तीचे पालन केले की नाही, याची साधी तपासणी होत नाही. जवळपास संपूर्ण रस्ता व्यापणारे मंडप हे त्याची साक्ष आहे. पालिकेच्या अटी-शर्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना दिली आहे. मंडप उभारताना काँक्रीट वा डांबरी रस्त्यावर खड्डे करू नये असे म्हटले आहे. सार्वजनिक मंडळांनी या नियमाचे पालन केले काय, याची साधी चौकशी झालेली नाही.
वाहतुकीवर र्निबध
गणेशोत्सवातील आरास पाहण्यासाठी शहरात गर्दी होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने काही प्रमुख मार्गावरील वाहतुकीवर र्निबध आणले आहेत. ८ सप्टेंबपर्यंत हे र्निबध कायम राहणार असल्याचे पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी म्हटले आहे.
’सांगली बँक सिग्नल ते सारडा सर्कलपर्यंतचा मार्ग सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने सांगली बँक सिग्नलवरून मेहर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे पुढे जातील.
’अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानचा रस्ता ‘नो पार्किंग झोन’ जाहीर
’निमाणी बसस्थानकावरुन पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा मार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस व जड मोटारींना दुपारी दोन ते रात्री बारापर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.
’सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बसेस व जड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.
’किटकॅट चौफुली ते महाकवी कालिदास कला मंदिरमार्गे शालिमारकडे जाणारा रस्ता दोन्ही बाजुकडील वाहतुकीस बंद राहणार आहे.
’पंचवटीतील सरदार चौक ते काळाराम मंदिपर्यंतचा रस्ता, मालवीय चौक ते गजानन चौक व गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक व शिवाजी चौक ते मालवीय चौक या मार्गावरील वाहतूक सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत बंद राहणार आहे.