गणेशोत्सव काळात पनवेल शहरातील अंतर्गत चौक आणि रस्ते सध्या वाहतूक कोंडीचे केंद्र बनले आहेत. भाजी मार्केट परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव आणि रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांमुळे ही कोंडी पोलिसांना सोडविणे कठीण झाली आहे. यामध्येच पनवेल वाहतूक विभागाचे पोलीस गायब झाल्याने ही कोंडी सुटण्याऐवजी वाढत आहे.
पनवेलकरांना सध्या घराबाहेर बाजारात स्वत:ची दुचाकी घेऊन खरेदीसाठी निघणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. शहरात सम-विषम पार्किंगचे नियम आहेत. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर वाहनातील माल काढण्यासाठी अवजड वाहनांच्या पार्किंगमुळे टपाल नाका हा परिसर वाहतूक कोंडीने भरलेला दिसतो. येथे व्यापाऱ्यांच्या धाकामुळे वाहनांवर कारवाई करण्याची धमक पोलीस विभागाने गमावल्याने येथे बारमाही वाहतूक कोंडीचा विळखा कायम आहे. अशीच परिस्थिती पंचरत्न हॉटेलकडून टपाल नाक्याकडे येणाऱ्या मार्गाची आहे. टपाल नाका येथून मोहल्ला येथे ये-जा करण्यासाठी वाहनचालकांना अशाच अडचणींना पार करून येथून वाहने चालवावी लागतात. रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांवर नगर परिषद प्रशासनाने आणि पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने येथे विक्रेत्यांची चंगळ झाली आहे. मात्र यामुळे सामान्यांची चालण्यासाठीची धडपड पाहायला मिळते. नगर परिषदेकडून मिरची गल्लीकडे जाणाऱ्या नो एन्ट्री मार्गावर दोन महिला पोलीस तैनात आहेत. याअगोदर पनवेलची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाने पनवेल नगर परिषदेने फुटपाथ व रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठीचा तगादा लावला होता. मात्र नगर परिषदेकडून व्यासपीठावरील आश्वासना व्यतिरिक्त प्रत्यक्षात अतिक्रमण हटविण्याच्या अंमलबजावणीबाबत तशा हालचाली होताना दिसल्या नाहीत. यासंदर्भात पनवेलचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही आम्ही वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. विसर्जनासाठी तलावांकडे जाणाऱ्या मार्गाला विशेष प्राधान्य देऊन तेथे पोलीस तैनात केले आहेत. वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची माहिती दिल्यास आम्ही तेथे पोलीस बंदोबस्त लावू असे त्यांनी सांगितले.