राम नवमी आणि त्यानंतर कामदा एकादशीच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या रामरथ आणि गरुड रथ मिरवणुकीच्या पाश्र्वभूमीवर, शनिवारी काळाराम मंदीर पूर्व दरवाजालगतचा सरदार चौक ते काळाराम मंदीर हा रस्ता तर सोमवारी मिरवणूक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी म्हटले आहे.
पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव शनिवारी साजरा होत असून त्यानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दिवशी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सरदार चौक ते काळाराम मंदीर पूर्व दरवाजा अरुंद असल्याने या मार्गावर वाहनांची ये-जा झाल्यास वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. यामुळे भाविकांच्या सोईसाठी शनिवारी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत उपरोक्त मार्ग दोन्ही बाजुच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. या मार्गावरून जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रामनवमीनंतरच्या एकादशीच्या दिवशी राम रथ आणि गरुड रथाची मिरवणूक काढली जाते. यंदा सोमवारी ही मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीदरम्यान अडचणी येऊ नयेत म्हणून काळाराम मंदीर पूर्व दरवाजापासून नागचौक, चरण पादुका चौक, लक्ष्मण झुला पूल, जुना आडगाव नाका, गणेश वाडी रोड, मरीमाता मंदीर, गंगापात्र म्हसोबा पटांगण, संत गाडगे महाराज पुलावरून, नेहरु चौक, चांदवडकर बाजार, भांडीबाजार, म्हसोबा पटांगण, सांडवा देवी मंदीर, भाजीबाजार, अहिल्याराम व्यायामशाळा, रामकुंड ते परशुराम पुरिया रस्ता, शनिचौक, हनुमान चौक ते काळाराम मंदीर पूर्व दरवाजा या मिरवणूक मार्गावरील वाहतूक सोमवारी दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. हे र्निबध पोलीस दलाची वाहने, रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.