महाराष्ट्राच्या पूवरेत्तर सीमेवरील पर्यायाने नागपूर जिल्ह्य़ाच्या जंगलात देशी कट्टे व पिस्तुलांचा अवैध व्यापार होत असून नागपूर शहर व विदर्भातील अनेक गुन्हेगारांजवळ ती आधीच पोहोचली असल्याचे उघड झाले आहे.
नागपूर शहराजवळील फेटरी, चक्कीखापा तसेच देवलापार, खापा, पारशिवनी हा गर्द वनराईने वेढलेला परिसर आहे. नागपूर जिल्ह्य़ाच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या पूवरेत्तर सीमेवर मोठय़ा प्रमाणात जंगल असून त्याचा वापर अवैधरित्या केल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या परिसरात अवघ्या सात ते आठ हजार रुपयात देशी कट्टे सहज उपलब्ध होतात. दहा हजार रुपयात देशी रिव्हॉल्वर किंवा देशी कट्टा किंवा देशी पिस्तुल व त्यासोबत पाच काडतुसे, असे हे पॅकेज आहे. या व्यापारालाही आता महागाईची झळ पोहोचली आहे. प्रति शस्त्र किमान दोन ते चार हजार रुपये कमाई असल्याने अनेकजण या व्यवसायात गुंतले आहेत. थोडी फिल्डिंग लावली की स्थान पक्के केले जाते. त्या ठिकाणी या हाताने रक्कम व दुसऱ्या हाताने शस्त्र दिले जाते. मात्र, काडतुसे त्याचवेळी दिली जात नाहीत. ती नंतर ठरलेल्या वेळीच दिली जातात.
ही शस्त्रे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारमधून रेल्वे तसेच रस्ते मार्गाने आणली जातात. एकावेळी तीन ते चारच शस्त्रे विकली जातात. पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. तीन वर्षांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने ‘वन लाईन इन्फर्मेशन’च्या आधारे मनसरजवळ सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत नागपूर जिल्हा व विदर्भाच्या पूवरेत्तर सीमेवरील जंगलात अवैध शस्त्रांचा व्यापार सुरू असल्याचे प्रथमच उघड झाले होते. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये देशी कट्टा, देशी रिव्हॉल्वर व देशी पिस्तुल तयार करण्याचे अवैध कारखाने मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, काडतुसे येतात कुठून, असा प्रश्न कायम आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त निलेश राऊत, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व एस.एम. गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप अतुलकर यांच्या नेतृत्वाखालील शहर गुन्हे शाखेच्या पथकाने रामभाऊ म्हाळगीनगर रिंग रोडवर बेसा पॉवर हाऊससमोर काल बुधवारी सापळा रचून आरोपी मोहम्मद शाहरुख उर्फ सॅमी शफी शेख (रा. आझाद कॉलनी मोठा ताजबाग)याला अटक केली. एक देशी पिस्तुल व दोन काडतुसे त्याच्याजवळून जप्त करण्यात आले. ताजबागमध्ये लहानाचा मोठा झालेला आरोपी राजा गौस देशी कट्टे विकत असल्याचे पोलिसांपासून लपून राहिलेले नाही. त्याच्या अटकेनंतरही हा व्यापार थांबलेला नाही. परप्रांताच्या सीमेवर शस्त्रांचा अवैध व्यापार सुरू असल्याबाबतस्थानिक पोलीस अनभिज्ञ कसे, गुंडांना अवैध शस्त्रे सहजतेने उपलब्ध होतातच कशी, आदी अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.