मध्य असो, पश्चिम असो किंवा हार्बर असो, उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्रत्येक स्थानकात प्रवाशांना भेडसावणाऱ्या हजारो समस्या आहेत. मात्र या हजारो समस्यांपैकी प्रसाधनगृहांची समस्या वगळल्यास आणखी एक समान समस्या म्हणजे रेल्वे स्थानकांवर मुक्काम ठोकणाऱ्या भटक्या कुत्र्यांची! कोणत्याही रस्त्यावर-गल्लीबोळात असतात तशी कुत्र्यांची टोळय़ाच आता फलाटांवर निर्माण झाल्या असून अनेकदा कुत्र्यांमध्ये सुरू होणाऱ्या ‘टोळीयुद्धा’मुळे प्रवाशांना अक्षरश: जीव मुठीत धरून स्थानकांवर वावरावे लागत आहे. मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या जवळपास प्रत्येक स्थानकाच्या तिकीट खिडक्यांजवळ, प्लॅटफॉर्मवर ही श्वानमंडळी आपला अड्डा ठोकून असतात. अनेकदा तर रेल्वे प्रशासनानेच यांची नेमणूक केली आहे की काय, असा संशय यावा, अशी या कुत्र्यांची वागणूक असते. कारण एखादी व्यक्ती गाडी पकडण्यासाठी धावत असली, तर हे कुत्रे जीव खाऊन त्यांच्या अंगावर भुंकण्याचे काम करतात. दचकलेल्या प्रवाशांना गाडी काय, स्वत:च्या हातातील पिशवी पकडणेही मुश्किल होऊन बसते. तर अनेकदा या श्वानसंप्रदायात अशी काही जुंपते की, हे कुत्रे एकमेकांच्या अंगावर वस्सकन धावून जातात. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडते. कुत्र्यांच्या टोळय़ा तिकीट खिडक्यांजवळही विसाव्याला येतात. तेथेही त्यांची आपसातील दुष्मनी उफाळून येते आणि तिकीट रांगेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून स्तब्ध राहण्याची कसरत करावी लागते. काही ‘प्राणीमित्र’ प्रवासी (यातही महिलांची संख्या जास्त) या भटक्या कुत्र्यांना बिस्कीटे वगैरे खायला घालून त्यांच्या ‘उदरभरणा’चा प्रश्नही मिटवतात. मुलुंड स्थानकात तर अशा कुत्र्यांना स्थानकाबाहेर काढण्याची मोहीम हाती घेतलेल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना चक्क प्राणीमित्र संघटनांचा कडवा विरोधही सहन करावा लागला होता.
या कुत्र्यांबाबत रेल्वे प्रशासन नेमके काय करणार, असा प्रश्न पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन यांना विचारला असता, त्यांनी ‘रेल्वे काहीही करण्यास असमर्थ असल्या’चे सांगितले. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे काम पालिकेकडे आहे. पालिका हे काम करत नसल्यास आमचा नाइलाज आहे. रेल्वे काही कुत्र्यांना हाकलवण्यासाठी खास मोहीम हाती घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र रेल्वेतर्फे पालिकेला तशी काही विनंती करण्यात आली आहे अथवा नाही, याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. आता पालिका स्वत:हून काही करेपर्यंत तरी प्रवाशांना या श्वानांसह एकत्र वावरण्याची कसरत करावी लागणार आहे.