मानव-वन्यजीव संघर्ष, आणीबाणीचा प्रसंग, शिकारीच्या प्रयत्नात जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर उपचार आणि उपचारानंतर पिंजऱ्यात न ठेवता जंगलात सोडण्याच्या उद्देशाने सेमिनरी हिल्सवर प्रस्तावित ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ पूर्णत्वास आले आहे. उर्वरित बारिकसारिक बाबींची पूर्तता केल्यानंतर येत्या अधिवेशनात या केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती वनखात्यातील सूत्रांनी दिली. भारतात वन्यप्राण्यांवर उपचार करणारी केंद्रे आहेत, पण उपचार करून वन्यजीवांना जंगलात सोडणारे हे राज्यातील पहिले केंद्र ठरणार आहे.
गेल्या दहा वषार्ंत जखमी अवस्थेतील वाघ आणि बिबटे उपचारानंतरसुद्धा जंगलात न सोडता पिंजऱ्यातच अडकून पडले आहेत. त्यामुळे जखमी झालेला वन्यप्राणी नागपुरातील सेमिनरी हिल्सवर तात्पुरत्या उभारलेल्या कापडी भिंतीच्या आत उपचारासाठी आणले जात होते आणि गंजलेल्या पिंजऱ्यात अडकून पडत होते. त्यातील काही मृत्यूपंथाला तर काही महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आश्रयाला गेले. या दैनावस्थेतून वन्यप्राण्यांची सुटका करण्यासाठी वनखाते आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यासाठी ६३ लाख ३८ हजार रुपयांच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. सेमिनरी हिल्सवरील नीलगाय आणि हरणांचा परिसर रिकामा झाल्याने या जागेवर वास्तू विशारदांकडून केंद्राचा विस्तृत नकाशा मंजूर झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने या केंद्राची जबाबदारी स्वीकारली. आता हे केंद्र पूर्णत्वास आले असून बारिकसारिक बाबींची पूर्तता तेवढी बाकी आहे.
वन्यप्राण्यांच्या उपचाराकरिता ‘नाईट शेल्टर’ आणि ‘ओपन एन्क्लोजर’ला जोडून असलेला उपचाराचा पिंजरा या केंद्रात आहे. उपचारानंतर वन्यप्राणी या मोकळया जागेत फिरू शकतील. हरीण प्रजातीसाठीसुद्धा दोन जुन्या शेडची दुरुस्त करण्यात आली असून उपचार पिंजऱ्यात त्याचे रूपांतर करण्यात आले आहे. वाघांकरिता तीन उपचाराचे पिंजरे व दोन वाहतूक पिंजरे, तर बिबटय़ासाठी दोन उपचार पिंजरे व दोन वाहतूक पिंजरे आहेत. या केंद्राची जबाबदारी एक वनपरिक्षेत्र अधिकारी, दोन वनपाल, चार वनरक्षक आणि सहा मजुरांवर सोपविण्यात आली आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यक महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांची सेवा या केंद्राला मिळणार आहे.