रेल्वेने तिकीट चार महिन्याआधी बुकिंग करण्याचे धोरण एक एप्रिलपासून जाहीर केल्याने विदर्भातून नागपूर, औरंगाबाद, जळगावला शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी गेलेल्यांचा प्रवास आणखी कठीण झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी उन्हाळ्याची चाहूल लागताच भरमसाठ दर वाढवल्याने प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू झाली आहे.
रेल्वेने तत्काळ तिकीट विक्रीची पद्धती सुरू केली आहे. मात्र, प्रवाशांना त्यातून देखील तिकीट मिळत नाही. यामुळे खासगी बसेसशिवाय पर्याय दिसत नाही. याचाच लाभ घेत खासगी बस चालकांनी ६० ते ७५ टक्क्य़ांनी बस भाडे वाढवले आहेत.
साधरणात:  ७०० ते ८०० रुपयांचे तिकीट आता १२०० ते १३०० रुपयांना विकले जात आहे. यासंदर्भात नागपुरातील विविध ट्रॅव्हल्स एजन्सीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता नागपूरहून पुण्यासाठी वेगवेगळे तिकीट दर असल्याचे दिसून आले. यात स्लिपर, नॉनस्लिपर आणि व्होल्व्हो बसच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे.
नागपूर आणि विदर्भातून पुण्याला शिक्षण व नोकरीसाठी गेलेल्यांना उन्हाळ्यातील सुटीच्या दिवसात नागपुरात येण्यासाठी खिसा खाली करावा लागत आहे. रेल्वेचे तिकीट बुकिंग चार महिन्याआधी सुरू होते. ज्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुटीत घरी जायचे आहे. ते तिकीट आगाऊ घेऊ शकत नाही. कारण परीक्षेचे वेळापत्रक चार महिन्यांआधी येत नाही. नोकरी करणाऱ्यांना कार्यालयातून चार महिन्याआधी सुटी मंजूर केली जाऊ शकत नाही. अशासाठी रेल्वे प्रवास शक्य होत नाही आणि एसटी महामंडळाची बस देखील गैरसोईची आहे. सुविधा कमी तिकीट दर अधिक तसेच खासगी बसेसप्रमाणे बुकिंग करणे सोपे  काम नाही. या प्रवाशांना खासगी बसेसचा पर्याय निवडावा लागत असून हे बस संचालक त्यांची लूट करीत आहेत. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी हंगामानुसार दर बदलण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे मोसम, सण आणि दिवसानुसार तिकीट दर बदलत असल्याचे दिसून येते. सोमवारचे तिकीट दर आणि शनिवारचे दर यात दोनशे ते चारशे रुपयांचा फरक आढळून येतो. तसेच नागपूरहून पुण्याला जाण्यासाठी एका प्रवाशाला ११०० रुपये लागत असतील तर पुण्याहून नागपूरला येण्यासाठी १३०० ते १४०० रुपये आकारले जात आहेत. एसटी महामंडळाच्या निमआराम बसेसचे दर वर्षभर एकसारखे राहत असलेतरी प्रवाशांना एसटीने लांबचा प्रवास करावासा वाटत नसल्याचे दिसून आले आहे. नागपूरहून पुण्याकरिता एसटीची निमआराम सेवा आहे. या बसचे एका तिकिटाचे भाडे ११६६ रुपये आहे.
प्रवासी रेल्वे आणि खासगी बसचा पर्याय उपलब्ध नसला तर एसटीचा विचार करीत असल्याचे आढळून आले आहे.

नागपूर-पुणे
(ट्रॅव्हल्सचे दर)
एसी स्लिपरचे ११०० ते १३०० रुपये.
व्होल्व्होचे दर २२०० रुपये.
रेल्वे
गरीब रथ- ७९५ रुपये.
(एक्सप्रेस)
स्लिपर क्लास, दर ४६० रुपये.
एसी थ्री टायर- १२०० रुपये
एसी टू टायर १७१५ रुपये.
एसटीचे भाडे
निमआराम बस- ११६६ रुपये.