एके काळी लोकांच्या कौतुकाचा विषय असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधील मित्रमंडळींचा समूह आता टोळक्याच्या दिशेने वाटचाल करू लागल्याबद्दल प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे. ठरावीक गाडीच्या ठरावीक डब्यात नियमित प्रवास करणारी ही मंडळी झुंडशाही करीत इतरांचा प्रवास खराब करतात. ही टोळकी जागा अडवून धरीत इतर प्रवाशांना बसण्याची संधी देत नाहीत. प्रसंगी दरवाजे अडवून इतर स्थानकांवरील प्रवाशांना चढू देत नाहीत, या तक्रारी नेहमीच्या झाल्या आहेत. मात्र आता उपनगरीय गाडय़ांमधील झुंडशाहीची लागण छोटय़ा पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमध्येही सुरू झाली असून रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी एका पथकाने पश्चिम रेल्वे मार्गावरील इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये कारवाई करीत १८ महिलांना ताब्यात घेतले.मुंबई-पुणे, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-मनमाड, मुंबई-सुरत अशा छोटय़ा अंतरावर चालणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाडय़ांनी नियमित प्रवास करणाऱ्या टोळक्यांकडून अन्य प्रवाशांना सातत्याने त्रास दिला जात असल्याच्या तक्रारींत वाढ झाली आहे.पश्चिम रेल्वेमार्गावरील मुंबई-सुरत यांदरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये काही महिला अशीच अरेरावी करीत असल्याची तक्रार एका महिला प्रवाशाने रेल्वे सुरक्षा दलाकडे केली. या तक्रारीची दखल घेत रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला अधिकारी-कर्मचारी यांचे एक पथक साध्या वेशात या गाडीत चढले. त्यांनी रिकाम्या आसनांवर ठाण मांडल्यांनतर या गाडीत शिरलेल्या १८ महिलांच्या टोळक्याने त्यांच्याशी अरेरावीने हुज्जत घालण्यास सुरुवात केली आणि नंतर दांडगाई सुरू केली. त्यामुळे तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी या १८ महिलांना बोईसर रेल्वे स्थानकात उतरवीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
लांब पल्ल्याच्या गाडय़ांप्रमाणे उपनगरीय गाडय़ांमध्येही अशा प्रकारे नेमाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची टोळकी झुंडशाही करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. लोकल गाडय़ांमध्ये अशा टोळक्यांची आणि प्रवाशांची मारामारी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांबरोबरच उपनगरीय गाडय़ांमधील टोळक्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.