कोपरखैरणे येथील तेरणा विद्यालयाच्या आवारातील वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आलेली आहे. धोकादायक फांद्या छाटणाच्या नावाखाली शुक्रवारी अनेक वृक्षांची कत्तल केली असल्याने वृक्षप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबविण्यात आले आहे. तसेच याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घडनास्थळी पाहणी केली. मात्र राजकीय दडपणामुळे वृक्षांची कत्तल करण्यात आली नसून, काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळात हे वृक्ष उन्मळून पडले असल्याचा जावाईशोध अधिकाऱ्यांनी लावला आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादायक फांद्या छाटणीच्या नावाखाली परवानगी घेऊन वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात येते. कायद्याने संबंधितांवर कारवाईदेखील करता येते. मात्र चिरिमिरी खाऊन अधिकारी कारणे दाखवा नोटिसांशिवाय कोणतीच कारवाई करीत नसल्याचे आतापर्यंतच्या प्रकरणांतून समोर आले आहे. वृक्षांची कत्तल करणारी एक साखळीच कार्यरत आहे. तोडण्यात आलेले वृक्ष हे स्मशानभूमीत किंवा शहरातील बेकऱ्यांना पुरविण्यात येत असल्याचे नेरुळ येथील एका बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात प्रसार माध्यमांनी समोर आणले होते. या साखळीत उद्यान विभागातील अधिकारीदेखील सहभागी असल्यानेच कारवाई होत नसल्याचा संशय वृक्षप्रेमींनी व्यक्त केला आहे.   शाळेत वृक्ष लागवडीचे आणि पर्यावरणाचे पाठ विद्यार्थ्यांना शिकविण्यात येतात. मात्र कोपरखैरण्यातील तेरणा विद्यालयाच्या आवारातील वृक्षांची त्यांनी नेमलेल्या ठेकेदाराकडून कत्तल सुरू असताना, शाळेतील एकाही शिक्षकाने ब्रदेखील न काढल्याने वृक्षप्रेंमींनी नाराजी व्यक्त केली आहे. शाळा या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे तुम्ही कोणता आदर्श ठेवत आहात, असा सवालदेखील उपस्थित केला आहे. शाळेला फक्त वृक्षाच्या धोकादायक फांद्या छाटणीची परवानगी असताना शाळेने नेमलेला ठेकेदार शशिकांत जगताप याने अनेक झाडे मध्यभागातूनच कापली असल्याची माहिती वृक्षप्रेमी आबा रणवरे यांनी दिली आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ठेकेदाराला विचारणा केली असता, त्याने काम थांबवले. तसेच याची माहिती तातडीने उद्यान अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  याबाबत तेरणा विद्यालयाच्या मुख्याधापिका (प्राथमिक) मंगला गोरडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वृक्षांची तोड करण्यात आली नसल्याचे सांगितले. शाळेच्या आवारात असलेल्या वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. साधारणत: १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसात काही वृक्ष उन्मळून पडल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीकरिता उद्यान विभागाचे उद्यान साहाय्यक प्रकाश गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्या ठिकाणी नेमके काय झाले आहे, हे पाहण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात आला आहे. शाळेने फांद्या छाटणीसाठी परवानगी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे तेथील काही वृक्ष उन्मळून पडल्याची प्राथमिक माहिती असून, अधिक माहितीसाठी उरणकर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितला. याप्रकरणी उद्यान विभागाचे प्रशांत उरणकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या ठिकाणची पाहणी केली असून त्या ठिकाणी फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. तसेच काही वृक्ष उन्मळून पडले असून ते तोडण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियमाप्रमाणे फांद्यांची छाटणी करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील तेथील ठेकेदाराला देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.