धूलिवंदनाचे रंग चढायला सुरुवात झाली असून उद्या शुक्रवारी ‘बुरा न मानो होली है..’ म्हणत राजकीय नेते, सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वजण सप्तरंगात न्हायला आणि इतरांनाही न्हाऊ घालायला सज्ज झाले आहेत. गुरुवारी दुपारनंतरच जिल्ह्य़ात विविध भागात धूलिवंदनाचा माहोल सुरू झाला. बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली असून मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. यावर्षी रासायनिक रंग मोठय़ा प्रमाणात विक्रीला आले असले तरी लोकांचा कल गुलाल आणि नैसर्गिक रंगाकडे दिसून येत आहे. मात्र, ते बाजारात पाहिजे त्या प्रमाणात विक्रीला नाहीत. रंगपंचमीनिमित्त कोटय़वधी रुपयांची उलाढाल बाजारात होत असल्याचे व्यापारांनी सांगितले.
घरोघरी लहान मुलांनी रंगपंचमीची तयारी केली आहे. दुसरीकडे रंग आणि स्टाईलीश पिचकाऱ्यांचा बाजारही ऐन रंगात आला आहे. इतवारी, महाल, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डीवरील बाजारपेठा रंग, पिचकाऱ्या, मुखवटे व इतर साहित्यांनी गजबजून गेल्या आहेत. धूलिवंदनाचा माहोल शहरात दिसू लागला आहे. शहरातील मोठी बाजारपेठ असलेल्या इतवारीमध्ये दुपारनंतर धूलिवंदनाचा माहोल सुरू झाला असून रंग आणि पिचकाऱ्या खरेदीसाठी बाजारात गर्दी दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ओबामा यांच्या छायाचित्रांसह अनेक अभिनेत्यांची छायाचित्रे असलेल्या पिचकाऱ्या बाजारात आल्या असून त्याला बाजारात चांगली मागणी आहे. विविध फळे, बंदुका, क्रिक्रेटच्या बॅटची प्रतिकृती असलेल्या पिचकाऱ्या बाजारात दिसत आहेत. इतवारीतील सौरभ स्टोअर्सचे मालक शैलेश जयस्वाल यांनी सांगितले. गुलाल, पाण्याचे रंग, डबीतील द्रवरूप रंग, रोडोमेन, गोल्डन, स्टार्च रंग यांची खरेदी चांगली आहे. या रंगांना यावर्षी चांगली मागणी आहे. जर्मनीचे रंग बाजारात आले आहेत. सात वेगवेगळ्या अत्तराच्या फ्लेव्हरमध्ये जर्मनीचे रंग ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळी गुलाल, गोल्डन, सिल्वर, रोडामेन, खडीचे रंग, या रंगांना जास्त मागणी असून त्याचे दर प्रतिकिलो ४५  रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे. पिचकाऱ्यांमध्ये चायनीज पिचकाऱ्यांचा बोलबाला असून मिकी माऊसचे चित्र असलेली ऑक्सिजन टँक पिचकारी ही बच्चे कंपनीची खास आकर्षण ठरली आहे. या शिवाय पारंपरिक पद्धतीच्या निरनिराळ्या पिचकाऱ्यांही बाजारात उपलब्ध आहेत.  मशीन गन असलेली पिचकारी सर्वात महाग असून त्यात एक ते दीड लिटर रंग भरला जातो.  महाल, इतवारी, सक्करदा, गोकुळपेठ आदी भागात सकाळपासूनच एकमेकाना रंग लावणे सुरू करण्यात आले. नैसर्गिक रंगाचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती केली जात असली बाजारात मात्र रासायानिक रंगाशिवाय दुसरे कुठलेही रंग दिसत नाही. वेगवेगळ्या पानाफुलांपासून किंवा बियाण्यांपासून प्रदूषणमुक्त तयार करण्यात आलेल्या रंगांमुळे त्वचा खराब होत नाही. मात्र, हे रंग बाजारात मिळत नसल्याची तक्रार अनेक लोकांनी केली. काही सामाजिक संस्थांनी रंग तयार केले आहेत. मात्र, ते बाजारपेठामध्ये पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.  पिवळा, गुलाबी, हिरवा, लाल इत्यादी रंगांमध्ये गुलाल बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्रीला आहेत.

नागपुरात ७०० वर होळ्या
नागपूर  : एकीकडे धूलिवंदनांची नशा चढत असताना शहरातील विविध भागात सायंकाळी शहरातील विविध भागात ७०० पेक्षा अधिक ठिकाणी बोंबा ठोकीत होळ्ी पेटविण्यात आली. पारंपरिक पद्धतीने महिलांनी पूजन करून नैवैद्य अर्पण केला. होळीचा दिवस धूम मस्ती करण्याचा दिवस असतो. शहरात दुपारपासून शहरातील महाल, इतवारी, सक्करदरा, गोकुळपेठ, सीताबर्डी इत्यादी भागात रंग उधळण्यास सुरुवात झालेली होती. इतवारी आणि गांधीबाग बाजारपेठ दुपारी ४ नंतर बंद करण्यात आल्यानंतर काही व्यापारी रंग खेळले. दुपारपासून होळी पेटवण्याची       वस्तीतील युवकांनी तयारी सुरू  केली होती. शहरातील विविध टालांवर गर्दी झाली होती. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. लोकांनी घरोघरी                 अडगळीत ठेवलेले जुने सामान होळीत  टाकण्यात आले. या निमित्ताने मद्याची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असल्यामुळे शहरातील बहुतेक मद्याच्या दुकानात लोकांची गर्दी दिसून आली.