शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यांनी संशोधनाकडे वळावे या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने  गेल्या २२ वर्षांपासून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये राज्यातील निवडक बाल वैज्ञानिक सहभागी होतात.
ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट ही संस्था गेली १४ वर्षांपासून या परिषदेचे राज्यस्तरीय संघटक म्हणून काम करत आहे. यंदाची ठाणे विभागीय आदिवासी बाल विज्ञान परिषद शुक्रवार ५ डिसेंबर रोजी भिवंडी तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा भिनार येथे होणार आहे.
राष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये गेल्या काही वर्षांपासून सहभागी होणाऱ्या आदिवासी विद्यार्थीची संख्या सातत्याने वाढत आहे. २०१३ च्या विज्ञान परिषदेमध्ये आदिवासी विकास आयुक्तालयाच्या माध्यमातून ७०७ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान परिषदेमध्ये सहभाग नोंदवून नावीन्यपूर्ण प्रयोगांची मांडणी केली होती. गेल्या बारा वर्षांपासून जिज्ञासा ट्रस्ट आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विज्ञान परिषद आयोजन करीत आहे. यंदा ठाणे विभागीय आदिवासी विज्ञान परिषद ५ डिसेंबर रोजी भिनार शासकीय आश्रमशाळेत होणार आहे. या विज्ञान परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा भूषविणार आहेत. तंत्रज्ञान सल्लागार डॉ. विवेकानंद वडके यांचे बीजभाषण होणार आहेत. या परिषदेचा विषय ‘समजून घेऊया हवा आणि हवामान’ असा आहे. डहाणू, शहापूर, सोलापूर, जव्हार, पेण आणि घोडेगाव या विभागातील दोनशेहून अधिक आश्रमशाळेतील विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. या परिषदेतून निवडलेल्या प्रकल्पांचा समावेश २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंगळुर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेमध्ये होणार असून ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. जिज्ञासाच्या वतीने मार्गदर्शन केलेला आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प दरवर्षी राष्ट्रीय परिषदेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असतो.
या परिषदेनिमित्ताने जिज्ञासा ट्रस्टने विज्ञान मेळावा आयोजित केला आहे. त्यात जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या संचालिका सुनंदा पटवर्धन, खगोल अभ्यासक हेमंत मोने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शिवाय गणिताची कार्यशाळाही तेथे होणार असून या उपक्रमात शिरीष मेढी, प्रकाश मोडक, रिमा देसाई, भानुदास पाटील, विश्वास कोरडे हसत खेळत गणित कृती, गणितातील गमती जमती, कोडी याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना देतील.