‘नच बलिये’ सुरू होण्याआधीच शोचा हॅशटॅग ‘टू मच’ तरुणांमध्ये लोकप्रिय होता. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची मित्रमंडळी मालिकेच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या परिचयाची झाली होती. ही किमया साधली, फेसबुक ट्विटरसारख्या सोशल मीडियासाइट्सनी.. सध्या विविध कारणांमुळे टीव्हीपासून दुरावलेल्या तरुण वर्गाला परत एकदा या टीव्हीकडे खेचण्यासाठी वाहिन्यांनी कंबर कसली असून सोशल मीडिया साइट्सवर मालिकांच्या प्रसिद्धीसाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.
‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील महत्त्वाकांशी मालिका ‘संकटमोचन महाबली हनुमान’चे नेहमीप्रमाणे संध्याकाळी टीव्हीवर प्रक्षेपण करण्यापूर्वी त्याच दिवशी ‘सोनी लाइव्ह’ मोबाइल अ‍ॅपवर याचे प्रक्षेपण दुपारी १२ वाजता करण्यात आले. ‘दिल की बातें’ या राम कपूरच्या मालिकेनिमित्त दिल्लीमध्ये आयोजित प्रसिद्धी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ट्विटरवर प्रश्नमंजूषा स्पर्धा केली होती. ‘झी टीव्ही’वरील ‘डीआयडी सुपर मॉम्स’च्या अंतिम फेरीसाठी भारतीय रिअ‍ॅलिटी शोसाठी पहिल्यांदाच फेसबुकवरून मतनोंदणी करायला मिळणार आहे. फेसबुक हे सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आकर्षित करणारे प्रभावी माध्यम असून, त्याच्या मदतीने मतप्रक्रिया अधिकच सुकर होण्यासही मदत होणार आहे. ही बाब ध्यानात घेऊन आम्ही ही संकल्पना सुरू केल्याचे वाहिनीच्या विपणन विभागाचे प्रमुख सुबरेजित चॅटर्जी यांनी सांगितले.
‘स्टार प्लस’नेसुद्धा ‘दिल..दोस्ती..मनमर्जियां’ मालिकेच्या प्रसिद्धीसाठी फेसबुकवर प्रेक्षकांच्या मनातली सुप्त इच्छा सांगणारे व्हिडीओज प्रसिद्ध केले होते. ‘नच बलिये’निमित्तही स्पर्धकांचे ट्विटरवरील हॅशटॅग रविवारी ट्रेडिंगमध्ये असतात. ‘रॉस्टार’साठीही वाहिनीने इच्छुकांना त्यांच्या गाण्याचे व्हिडीओज युटय़ूबवर अपलोड करायला सांगितले होते. त्यातून दहा पात्र स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कलाकारांचा दर महिन्याला फेसबुकवर चॅटिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद घडविला जातो. ‘कलर्स मराठी’ने ‘मिक्ता अवॉर्ड्स’च्या वेळेस प्रत्येक सादरीकरणानंतर फेसबुकवरून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. याशिवाय सध्या प्रत्येक वाहिनीचे फेसबुक पेज आहेच. त्याचबरोबर मालिका त्यांच्यातील कलाकार, लोकप्रिय जोडय़ांचेही फॅनपेजेस फेसबुकवर पाहायला मिळतात. एखादी नवी मालिका येण्यापूर्वी त्या मालिकेच्या नावाचा हॅशटॅग बनविला जातो. सध्या टीव्हीवरील दैनंदिन मालिकांना मिळणारा महिला प्रेक्षक वर्ग हा खूप मोठा असला तरी वाहिन्यांच्या दृष्टीने तो पुरेसा नाही. गेल्या काही वर्षांपासून भारतीय तरुण प्रेक्षक वर्ग या वाहिन्यांच्या हातातून निसटत चालला आहे. त्यामुळे या तरुण वर्गाला पुन्हा टीव्हीकडे वळविण्यासाठी वाहिन्या आता सोशल मीडियाची मदत घेऊ लागल्या आहेत. विविध स्पर्धा, कलाकारांशी भेटीगाठी या माध्यमातून तरुणाईला टीव्हीवर गुंतविण्याचे प्रयत्न वाहिन्यांकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे केवळ टीव्हीवरील प्राइमटाइमवरच नाही, तर सोशल मीडियावरही प्रेक्षकांसाठी या वाहिन्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

सोशल मीडिया वाहिन्यांसाठी प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. येथे आम्हाला प्रेक्षकांशी संवाद साधता येतोच आणि कार्यक्रमांबद्दल त्यांची प्रतिक्रियाही मिळते. फेसबुकसारख्या माध्यमावर वाहिनी, कलाकाराचे पेज लाइक करणारा तरुण हा प्रामाणिक प्रेक्षक असतो. तो कार्यक्रमाबद्दलची त्याची मते स्पष्टपणे मांडतो. इतकेच नाही, तर मालिकेतील पात्रांची ओळख निर्माण करून देण्यासाठी सोशल मीडिया आम्हाला मदत करते.
बत्जुबन नोंगबेट, विपणन विभागप्रमुख, कलर्स मराठी