उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायती हद्दीत अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून वाढत्या लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीने दोन इंचांऐवजी सहा इंचांची जलवाहिनी टाकून द्यावी, असा ठराव ग्रामपंचायतीने केला आहे. त्याची प्रत एमआयडीसीला देण्यात आली आहे. मात्र ग्रामपंचायतीची थकबाकी असल्याने जलवाहिनी वाढवून देता येणार नसल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात येत असल्याने केगावमध्ये आणखी किती महिने पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असा सवाल येथील नागरिकांकडून केला जात आहे.
उरण शहरालगत वसलेल्या केगाव ग्रामपंचायत हद्दीत दांडा, बाजारपूर, देवळी, आवेडा, खारखंड, विनायक, डोंगर आळी, वनवटी आदी परिसर मोडतो. या ग्रामपंचायत हद्दीची आठ हजारांची लोकवस्ती असताना एमआयडीसीकडून दोन इंचांच्या जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जात होता. सध्या या परिसरातील लोकवस्तीत वाढ झालेली असून त्यामुळे सर्वत्र पाणीपुरवठा होत नाही. म्हणून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तर या परिसरात असलेल्या विहिरीतही पाणी नसल्याने पाणीटंचाईत अधिक भर पडली आहे. त्यामुळे केगाव ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची क्षमता वाढवून मिळावी, अशी मागणी वारंवार एमआयडीसीकडे करूनही ती न दिल्याने अखेरीस केगाव ग्रामपंचायतीने ठराव करून मागणी केली आहे. त्यासाठी लागणारी रक्कम तसेच एमआयडीसीची थकबाकीही भरण्याची तयारी ग्रामंपचायतीने दाखविली आहे.
या संदर्भात एमआयडीसीचे उरण विभागाचे उपअभियंता एम. के. बोधे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयांची थकबाकी असल्याने जादा क्षमतेची जलवाहिनी देता येत नाही, तरीसुद्धा थकबाकी भरल्यास या संदर्भातील वाढीव जलवाहिनीचा प्रस्ताव अंधेरी येथील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची आपली तयारी आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार एमआयडीसीकडून जादा पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती बोधे यांनी दिली आहे.