‘डिस्कव्हरी नेटवर्क एशिया’ या समूहाने भारतात ‘डिस्कव्हरी चॅनेल इंडिया’ म्हणून प्रवेश केला आणि आता घरोघरी बस्तान बसवलेल्या या वाहिनीला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोगाने ६९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावरच वाहिनीचाही वीस वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यानिमित्ताने एक खास कार्यक्रम वाहिनीने तयार केला आहे. ब्रिटिश राजवट भारतात होती तेव्हापासून ते स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष आणि त्यानंतर एक स्वतंत्र देश म्हणून जागतिक नकाशावर उमटलेले भारताचे प्रतिबिंब याचा वेध घेणारा ‘इंडिया इमर्जेस : अ व्हिज्युअल हिस्ट्री’ हा खास कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे.
देशाचा ६९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असतानाच वाहिनीच्या वीस वर्षांचे सेलिब्रेशन हा आमच्यासाठी एक हळवा आणि अभिमानाचा असा क्षण आहे. त्यामुळे यानिमित्ताने, पुन्हा एकदा गुलामीतून बाहेर पडून एक स्वतंत्र देश म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या या देशाच्या इतिहासात पुन्हा डोकावण्याची संधी घेतली असल्याची माहिती वाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष राहुल जोहरी यांनी दिली. ‘इंडिया इमर्जेस : अ व्हिज्युअल हिस्ट्री’ हा विशेष कार्यक्रम तीन भागांमध्ये १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान रोज रात्री आठ वाजता दाखवण्यात येणार आहे. यात काही दुर्मीळ छायाचित्रे, काही दुर्मीळ ध्वनिचित्रफिती, कागदपत्रांचे दस्तावेज पाहायला मिळतील, असे जोहरी यांनी सांगितले.
‘द राज’ या पहिल्याच भागात १७ व्या आणि १८ व्या शतकात ब्रिटिश वसाहतवादाची बळी ठरलेली भारत नामक सुवर्णभूमी, ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा देशावर झालेला परिणाम आणि याच दरम्यान हळूहळू का होईना बंडखोरीतून देशातील जनतेच्या मनात उमटू लागलेली राष्ट्रीयतेची भावना याचे चित्रण असेल. तर ‘मार्च टुवर्ड्स फ्रीडम’ या दुसऱ्या भागात प्रत्यक्ष संघर्ष, स्वातंत्र्यासाठी उभ्या राहिलेल्या चळवळी यांचे चित्रण असेल. ‘अ नेशन बॉर्न’ या तिसऱ्या भागात १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पडलेला स्वातंत्र्याचा पहिला टोला, भारत-पाक फाळणी, इंदिरा गांधींची राजवट, आणीबाणी, ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ आणि अशा अनेक घटनांमधून तावूनसुलाखून बाहेर पडलेला, जगातील मोठी लोकशाही म्हणून नावाजलेल्या नव्या भारताचे चित्रण पहायला मिळेल. या मालिकेत अनेक दुर्मीळ घटनांसंबधीचे तपशील, व्हिडीओ फूटेज नव्याने पाहायला मिळणार आहे.